जरांगे अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करतायेत पण आता उपोषण मागे घ्यावं; राष्ट्रवादीच्या आमदाराचं आवाहन
MLA Rohit Pawar on Manoj Jarange Patil and Maratha Reservation : सत्ताधाऱ्यांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदाराचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन; म्हणाले, जरांगे अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करतायेत, पण आता उपोषण मागे घ्या...
मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. वर्षानुवर्षांपासून सुरु असलेल्या या मागणीला मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने अधिक बळ मिळालं आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारकडून त्यांच्याशी सतत संपर्क केला जात आहे. मात्र पंधरा दिवसात चारवेळा भेटी घेऊनही मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. आज शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही जाऊन समजूत काढली. पण ते अद्याप मागे हटलेले नाहीत. पण त्यांनी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. जरांगे अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत. पण त्यांची तब्येत ढासळते आहे. त्यामुळे तब्येतीसाठी त्यांनी आता उपोषण मागे घ्यावं. मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे आणि आरक्षण मिळेपर्यंत तो पुढेही कायम राहील. पण खालावत चालेलली तब्येत पाहता जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं
मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.
आरक्षणाचा लढा कायम राहीलच, परंतु मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या खऱ्या आणि निस्वार्थी हिऱ्याचे आरोग्य धोक्यात आले तर समाजाचे खूप मोठे नुकसान होईल. त्यामुळे तूर्तास तरी समाजाचा व कुटुंबाचा विचार करून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यायला हवे. सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी, कौटुंबिक-मित्र परिवारासह सर्वांनीच उपोषण सोडण्यासाठी त्यांना साद घालावी ही कळकळीची विनंती.
मनोज जरांगे पाटील अत्यंत तळमळीने, जिद्दीने उपोषण करत आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याचे त्यांच्या आवाजावरून जाणवत आहे. तसेच त्यांची एक किडनी सुद्धा काम करत नाही. परिणामी उपोषण सुरु ठेवणे मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या दृष्टीने… pic.twitter.com/OE9CYZbStH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 12, 2023
जरांगे यांची भूमिका काय?
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या प्रमुख मागणीसाठी जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्यासाठी ते उपोषण करत आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांची आहे. ही मागणी पूर्ण झाली की उपोषन लगेच मागे घेतो, असं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे.