मुंबई : शरद पवार यांनीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहावे अशी राष्ट्रावादीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मत व्यक्त केले आहे. त्यामध्ये संजय राऊत म्हणाले, लोकसभा निवडणूक होईपर्यन्त शरद पवार यांनीच पक्षाच्या प्रमुखपदी कायम राहावे अशी सार्वत्रिक भावना आहे. देशातले सगळे प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही भावना व्यक्त केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची आघाडी स्थापन होण्यासाठी शरद पवार हे महत्वाचे व्यक्ती आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या अध्यक्षस्थानी राहणे गरजेचे आहे. त्याचा फार काही फरक पडणार नाही पण देशाच्या राजकारणात त्यांनी राहावं आणि त्यांची गरज असल्याची भावना अनेक नेत्यांची आहे असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त करत असतांना शरद पवार यांनी व्यक्तिगत निर्णय घेतला असला तरी देशाला असलेली गरज पाहता त्यांनी फेरविचार करावा असे मत व्यक्त केले आहे. यामध्ये कार्याध्यक्ष पद निर्माण करावं का यावर बोलतांना संजय राऊत यांनी तो त्यांच्या पक्षातील विषय असल्याचे मत मांडले आहे.
शरद पवार हे देशाच्या राजकारणात राहावे यासाठी त्यांना इतर विरोधी पक्षातील नेत्यांनी विनंती केली ही महत्वाची बाब आहे असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. तर दुसरीकडे अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांनी दिलेला राजीनामा नामंजूर करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं असं मत व्यक्त केले आहे. तसा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे.
तो ठराव अध्यक्ष निवड समितीचे पदाधिकारी शरद पवार यांच्याकडे देणार आहे. शरद पवार यांनाच याबाबत गळ घालणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या कोर्टात अध्यक्ष पदाचा चेंडू गेला असून त्यावर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदे मी सल्ला देणारा कोण? आणि दिला तर पचणी पडेल का? अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे अशी भूमिका मांडली आहे.