मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बारसू प्रकरणावरुन सरकारवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध असतांना सरकार रिफायनरी प्रकल्प का करत आहे? उद्योगमंत्र्यांना हाताशी धरून बारसूतीळ नागरिकांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सर्व्हेला नागरिकांनी विरोध केल्यानंतर त्याला अटक केली जात आहे. उद्या त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जाईल. सरकारला जालियनवाला बाग हत्याकांडासारखं बारसू हत्याकांड घडवायचं आहे का? असा गंभीर आरोप करत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांनी याबाबत माहिती घेतली असून वेळ आली तर आम्हाला तिथं जावे लागेल म्हणत सरकारला इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाकडून रत्नागिरीत बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीचे सर्व्हेक्षण केले जात आहे. त्याच दरम्यान बारसू येथे काही महिलांनी जमिनीवर झोपून शासकीय अधिकाऱ्यांच्या सर्व्हेक्षणाला विरोध करत आंदोलन सुरू केले आहे. याच दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, उद्या संजय राऊत यांची दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर जाहीर सभा होणार आहे. ही सभा तेथील शेतकऱ्यांनी आयोजित केल्याचे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. याशिवाय भाजप आमदार राहुल कुल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदपत्रे सीबीआयला दिले असून त्याची पोच मिळाल्याचे राऊत यांनी म्हंटलं आहे.
राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखाना आणि तिकडे मालेगाव येथील गिरणा बचावच्या नावाखाली अठराशे कोटी रुपये जमा करून भ्रष्टाचार केल्याचा पुन्हा आरोप करत संजय राऊत आक्रमक झाले आहे. संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत सीबीआय आणि ईडीकडे हे कागदपत्रे देणार असल्याचे म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आधार घेत संजय राऊत यांनी त्यांना मी स्मरणपत्र पाठविले होते. मात्र, त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. असे सांगत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांनी आमच्याकडे असलेल्या लोकांवर आरोप करायचे आणि मशीनमध्ये टाकून धुवून घ्यायचे म्हणत भाजपवर जहरी टीका केली आहे. यामध्ये आता संजय राऊत उद्या सभा घेणार आहे ती सभा शेतकऱ्यांनी आयोजित केल्याचं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.