मुंबई : रत्नागिरी येथील रिफायनरीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर बैठक पार पडत आहे. बारसू येथील जमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केल्यानंतर प्रशासनाने काही महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये संजय राऊत यांनी सरकारला सामूहिक हत्याकांड करायचे आहे असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर बोलत असतांना उद्धव ठाकरे हे देखील याबाबत माहिती घेत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर संजय राऊत, विनायक राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांची बारसू आंदोलन प्रकरणी आढावा घेतला जात आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असल्याची शक्यता आहे.
सकाळपासून रिफायनरी सर्व्हेक्षणाचा मुद्दा तापला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. जालियनवाला बाग हत्याकांड जसे झाले तसे बारसू हत्याकांड घडविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांच्या उपस्थिती उद्धव ठाकरे मातोश्रीवर चर्चा करत आहे. या प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये बारसूतील शेतकऱ्यांची भेट उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता असून त्याबाबत पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात महाविकास आघाडीची अद्याप भूमिका जाहीर नसली तरी कोंकण भाग असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यामध्ये उडी घेतली असून याबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. शिंदे फडणवीस सरकारला घेरण्यासाठी ठाकरे गटाला आणखी एक मुद्दा मिळाला आहे.
बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन हस्तांतरण होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सर्व्हेक्षण होत आहे. त्याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामध्ये काही नागरिक मुंबईत राहत असल्याने त्यांचाही विरोध आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत भर पडली आहे.
प्रकल्प सुरू करण्या आधीच विरोध होऊ लागल्याने आणि त्यात शिवसेना ठाकरे गटही उडी घेऊ पाहत असल्याने आगामी काळात राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. त्यातच काही महिलांना तिथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे आढावा घेत असून याबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.