मोठमोठ्या क्रेन मागवल्या, NDRF ची टीम घाटकोपरमध्ये; रात्रभर बचावकार्य चालणार
मुंबईतील घाटकोपर येथील छेडानगरात जाहीरातीचे भलेमोठे होर्डींग्ज वादळी वाऱ्याने कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 35 हून अधिक जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात यश मिळाले असले तरी शंभरहून अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी बचावासाठी एनडीआरएफच्य़ा पथकाला पाचारण केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी सायंकाळी अचानक धुळीचे वादळ आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागात अपघातांची मालिका घडली. घाटकोपर परिसरातील छेडा नगरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला असून या ठिकाणी पेट्रोल पंपावर वाट पाऊस थांबण्याची वाट पाहणारे शंभरहून अधिक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेमुळे बचावासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफ ( NDRF ) बचावाचे काम रात्रभर चालणार आहे. आतापर्यंत ढीगाऱ्या खालून 35 हून अधिक नागरिकांना ढीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमीची रवानगी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात करण्यात आली आहे.
मुंबई महानगरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास धुळीच्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी झाली. मुंबईकर आपआपल्या दैनंदित व्यवहारात व्यस्त असाताना अचानक कोसळलेल्या पावसाने घाटकोपर येथील होर्डींग कोसळून त्यांच्या खाली अनेक वाहने अडकली. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारासअचानक वादळ आणि मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, घाटकोपर (पू) येथील समता कॉलनीच्या रेल्वे पेट्रोल पंपावर 70/50 मीटर आकाराचे भलेमोठ्या होर्डिंगचा मेटल गर्डर अचानक कोसळला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. दरम्यान, मुंबई महानगर पालिकेने या प्रकरणी रेल्वे आणि जाहीरात कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
एनडीआरएफ टीम मदतीला
पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी या पेट्रोल पंपावर असतानाच अचानक हे भले मोठे जाहीरातीचे होर्डींग कोसळल्याने अनेक जण या ढीगाऱ्याखाली वाहनांसकट अडकले. पावसाने आडोशाला उभे असलेले नागरिक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. या अपघातानंतर येथील ढीगाऱ्यातून 37 जणांना बाहेर काढले आहे. आणखी 50 ते 60 जण ढीगाऱ्याच्या खाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकांना मदतीला बोलावले आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदेश जारी केले आहे. अपघातग्रस्तांना आवश्यक मदत मिळावी यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी स्वत: महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
येथे पाहा व्हिडीओ –
BMC will file a complaint against Railway and Advertising company Ego Media in the matter of the hoarding falling incident in Ghatkopar which injured at least 35 people. The complaint will be filed for registering FIR under the Disaster Management Act: BMC PRO https://t.co/iFVxcHBQ4R
— ANI (@ANI) May 13, 2024
मुख्यमंत्री भेट देणार
घाटकोपर येथील छेडानगर परिसरात कोसळलेल्या होर्डिंगच्या दुर्घटनास्थळी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत. घटनास्थळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर ) डॉ. अश्विनी जोशी या स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका आणि इतर बचाव यंत्रणांना निर्देश देत आहेत. या ठिकाणाहून आतापर्यंत 35 पेक्षा अधिक नागरिकांना ढीगाऱ्याखालून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी 20 पेक्षा अधिक रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (NDRF) यांना देखील पाचारण करण्यात आले आहे. होर्डींग्जचा ढीग उपसून अडकलेल्या बाहेर काढण्यासाठी मोठ मोठ्या क्रेन मागविण्यात आल्या आहेत. आणि बचाव कार्य रात्रभर चालणार असल्याचे मुंबईतील पालीका सूत्रांनी म्हटले आहे.
पेट्रोल पंपामुळे गॅस कटर वापरण्यात अडचण
जाहिरातीचा बोर्ड कोसळला आहे. लोखंडी आणि सळया क्रेनच्या सहाय्याने उचलाव्या लागणार आहेत. पेट्रोल पंप असल्याने येथे लोखंड कापण्यासाठी गॅस कटरचा वापर करता येणार नाही. पेट्रोल पंपामुळे होर्डिंग हटवण्याच्या कामात मोठी अडचण होत आहे. या दुर्घटनेच्या बचावा मोहीमेवर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी डीझास्टर कंट्रोल रुममधून घटनेवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच भेट दिली आहे. अनेक नागरिक आत अडकले असल्याचा अंदाज आहे. आजची रात्र बचावकार्यात जाणार आहे. पालिकेने मोठमोठ्या क्रेन आणल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ टीम, पोलीस तसेच 20 ते 25 अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या आहेत. रात्रभर मोहीम चालणार आहे.
एमएमआरडीएचीही टीम दाखल
घाटकोपर छेडा नगर येथील होर्डींग्ज दुर्घटनेत मदतीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो लाइन – 4 अमर महल साइटवरून 60 कर्मचाऱ्यांची एक टीम मदतीला पाठवली आहे. या टीममध्ये अपघातस्थळी मदत करण्यासाठी लिफ्टिंग ऑपरेशन क्षेत्रात तज्ज्ञांच्या 25 जणांच्या टीमचा समावेश आहे. या टीमकडे बचाव पथकातील विशिष्ट कौशल्य आहे. आणि अशा मोहीमांचा खूप मोठा अनुभव आहे. ही टीम कुशल मजुरांसह, आवश्यक यंत्रसामग्री आणि साधनांनी सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4 हायड्रा क्रेन, 500 मेट्रिक टन क्रेन-2no आणि 4 गॅस कटरचा समावेश आहे.