मुंबईः राज्यसभेसाठी शिवसेनेकडून (ShivSena) दोन उमेदवारांच्या नावची घोषणा आज संध्याकाळी होणं अपेक्षित आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. भाजपाच्या नाकात दम आणणारे नेते म्हणून संजय राऊतांना दोन पैकी एका जागेवर उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला उरते ती एक जागा. कोल्हापुरचे छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. याकरिता ते सर्व पक्षांच्या पाठिंब्यासाठी विनंती करत आहे. संभाजीराजेंना आपला पाठिंबा असेल पण आधी त्यांना शिवसेनेत यावं लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. मातोश्रीवर शिवबंधन बांधण्यासाठीचं आमंत्रणही त्यांना देण्यात आलं. मात्र संभाजीराजेंनी हा प्रस्ताव फेटाळला. छत्रपती घराण्याचा सन्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. त्यानंतरही संभाजीराजे शिवसेनेत आले तरच आम्ही पाठिंबा आणि उमेदवारी देऊ, अशी भूमिका संजय राऊत यांनी आज पुन्हा स्पष्ट केली. आता संध्याकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत. त्यानंतरच छत्रपतींचा सन्मान की सच्च शिवसैनिक राज्यसभेवर उभा राहिल, हे स्पष्ट होईल. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून पुढील चित्र लवकरच दिसून येईल.
मागील दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. काल संभाजीराजेंनी मातोश्रीवर जाणं टाळलं. तर आजही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र छत्रपती घराण्याचा सन्मान होईल, असा मला विश्वास आहे, अशी सूचक टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी केली. त्यामुळे संभाजीराजेंनी पुन्हा एकदा हा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात टाकलाय.
दरम्यान, संभाजीराजेंच्या उपरोक्त वक्तव्यानंतर संजय राऊतांनीही आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या वतीने छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान निश्चित केला जाईल. मात्र उमेदवार शिवसेनेचाच असेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे संध्याकाळी राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. मात्र कोल्हापुरातून शिवसेना नेते संजय पवार यांचेही नाव चर्चेत आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत न येता अपक्ष म्हणून उभे राहण्याची भूमिका कायम ठेवली तर कोल्हापुरमधूनच त्यांना आव्हान देण्यासाठी संजय पवार यांना पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या घोषणेतून छत्रपतींचा सन्मान होणार की सच्चा शिवसैनिकालाच मान मिळणार, हे स्पष्ट होईल.