भजन रामाचे आणि कृती रावणाची; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

| Updated on: Jan 08, 2024 | 8:17 AM

Saamana Ecitorial on PM Narendra Modi and BJP : संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो, तेव्हा हुकूमशहांना देशातून पळून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

भजन रामाचे आणि कृती रावणाची; संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
Follow us on

मुंबई | 08 जानेवारी 2024 : ईडीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात येतो. अशातच आता ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडीने केलेल्या कारवाईवर सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘भजन रामाचे; कृती रावणाची’ शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. ईडी कारवाईवरून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

देशासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लोक तुरुंगात जायला तयार आहेत. केजरीवाल, सोरेन यांनी निर्भय होऊन हुकूमशाही विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात रोहित पवार यांनी ही काही झाले तरी शरण जाणार नाही असा अस्सल मराठी बाणा दाखवला आहे . ईव्हीएमविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत व ‘ईडी’ ची डोकी फुटली आहेत . तरीही जनता लढायला तयार आहे . संपूर्ण देशात संतापाचा लाव्हा उसळतो तेव्हा हुकूमशहांना देशातून पळून जावे लागते असे जगाचा इतिहास सांगतो . इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे . भजन रामाचे व कृती रावणाची ही भूमिका चालणार नाही!

सत्यवचनी प्रभू श्रीराम मोदी-शहांच्या सरकारला सुबुद्धी देतील असे वाटले होते, पण ‘आडात नाही, तर पोहऱ्यात कोठून येणार?’ या उक्तीप्रमाणे सध्या या सरकारचा कारभार चालला आहे. भजन रामाचे व कृती रावणाची हेच मोदी-शहा सरकारचे उद्योग सुरू आहेत. विरोधकांना नामोहरम करायचे व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूट गैरवापर करायचा हाच या सरकारचा उद्योग. रावण आणि कंसमामाने त्यांच्या विरोधकांना म्हणजे देव मंडळास बंदी बनवले होते. तरीही शेवटी या दोन्ही राक्षसांचा पराभव झालाच.

आपल्या देशातही शेवटी राम-कृष्णाचाच विजय झाला. त्यामुळे कलियुगात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस बळाचा वापर केला तरी जय सत्याचा होईल. रोहित पवार यांच्या कंपन्यांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते आहेत व भाजपच्या चोर बाजारात सामील होण्याचे त्यांनी टाळले, दबाव मानला नाही. अलीकडेच त्यांनी एक युवा संघर्ष यात्रा काढली. लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला. अजित पवार वगैरे लोकांनी घेतलेल्या डरपोक भूमिकेविरुद्ध ते परखडपणे बोलत आहेत. त्यामुळे ‘ईडी’चे संकट त्यांच्यावर कोसळणारच होते. ते शेवटी कोसळलेच.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची प्रतिक्रिया मनोरंजक व राजकीय विश्लेषकांनी अभ्यास करावी अशी आहे. श्री. फडणवीस म्हणतात, ”रोहित पवारांवर छापा पडला की नाही हे माहीत नाही. मात्र पवार हे व्यावसायिक असून व्यवसायात असे प्रकार होत असतात. त्यांनी काहीच केले नसेल तर घाबरण्याचे कारण नाही.” फडणवीस यांचा हा खुलासा म्हणजे शहाजोगपणाचा उत्तम नमुना आहे.

अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी व्यवसायात आहेत व त्यांच्या व्यवसायाचे रहस्य ईडीनेच उघड केले. ईडीने त्यांचे नरडे आवळताच या लोकांनी बेडकाप्रमाणे उडय़ा मारून भाजपचा आश्रय घेतला.