दत्ता दळवी यांना अटक, सामनातून टीकेचे बाण; तुकाराम महाराजांच्या ‘त्या’ अभंगाचा संदर्भ देत निशाणा
Saamana Editorial on Datta Dalvi Arrest : नालायकांचे सच बोलो! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दत्ता दळवींच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. वाचा...
मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. हे सुडाचं राजकारण सुरु आहे, म्हणत ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटावर निशाणा साधण्यात येतोय. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही यावरच भाष्य करण्यात आलं आहे. ‘नालायकांचे सच बोलो!’ शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच, असा निर्धार आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे.
सामना अग्रलेख जसाच्या तसा
शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्ड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल. मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली.
‘मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांना जी ‘इरसाल’ भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी गद्दार हृदयसम्राटांच्या बाबतीत केला. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच ‘भोसऑऑऑ’ या उपाधीचा वापर केल्याबद्दल ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय?
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा।। – संत तुकाराम
तुकारामांनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरटय़ा लोकांविषयी सांगितले, पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील ‘मिंधे’ सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती; कारण सत्य आणि परखड बोलणे हा आता दंडनीय अपराध झाला आहे. चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही. त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा, असे राज्यातील मिंधे सरकारचे फर्मान आहे. यातील काही जणांची स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे. राज्य एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक बाबतीत अधोगतीस जात आहे.
राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात दुःखच दुःख आले. उभी पिके चिखलात आडवी झाली. प्रचंड नुकसान झालेय. शेतकरी बांधावर बसून धाय मोकलून रडत असताना राज्याचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचे?
स्वतःचे घर असे वाऱ्यावर सोडून इतर राज्यांतील भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱयांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकारच्या नालायकीवर हल्ला केल्याबद्दल ‘गद्दार’ हृदयसम्राटांचे लोक उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी विनम्रपणे करतात. असे हे कलियुगातील खेळ चालले आहेत.