मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : अख्खा भारत देश विश्वचषक जिंकण्याची स्वप्न पाहत होता. वर्ल्ड कप भारतीय संघ जिंकेल, असा दृढ विश्वास मनाशी बाळगून संपूर्ण देश त्या दिवशी मॅच पाहत होता मात्र भारतीय संघ ही फायनल मॅच हरला आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. या सगळ्यावर बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पनौती असा उल्लेख केला. याच्याच आधारे आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ‘पनौती’ म्हणजे काय रे भाऊ? या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. वर्ल्डकपवर भाष्य करताना नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय.
पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये दोन भावांचा संवाद गाजला होता. त्यातील धाकटा भाऊ मोठ्या भावाला ‘दारू म्हणजे काय रे भाऊ?’ असे विचारत असे. हा संवाद पु. ल. त्यांच्या खुमासदार शैलीत रंगवून सांगत.
आपल्या देशात सध्या त्याच पद्धतीने ”पनौती म्हणजे काय रे भाऊ?” हा संवाद रंगला आहे. त्याला कारण ठरला अहमदाबाद येथील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा पराभव. आता हा पराभव कोणाच्या ‘पनौती’मुळे झाला की कुठल्या ‘पापी’ ग्रहांमुळे, यावर ज्योतिष्यांनी जरूर खल करावा. सर्वसामान्य जनता मात्र 2014 पासून देशाच्या पाठीमागे लागलेल्या ‘पनौती’बद्दल गांभीर्याने विचार करीत आहे, एवढं मात्र खरं!
निवडणूक आयोगाचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पंतप्रधान मोदी व भाजप परिवारावर टीका केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. लोकशाहीत टीकेस महत्त्व आहे, पण मोदी युगात ‘टीका’ हा अपराध ठरला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील निवडणूक प्रचार सभांत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘पनौती’ आणि ‘खिसेकापू’ असा केला. त्यामुळे भाजपवाले खवळले व त्यांनी निवडणूक आयोगास कारवाई करण्यास भाग पाडले.
निवडणूक आयोग हा भाजप आयोगच झाला असल्याने अशा कारवायांचे आश्चर्य वाटायला नको. राहुल गांधी यांनी एका प्रचार सभेत मिश्कील शैलीत सांगितले की, ”पीएम म्हणजे पनौती मोदी. ते क्रिकेट सामना पाहायला गेले आणि आपण पराभूत झालो. भारतीय संघ चांगला खेळत होता, पण पनौतीमुळे आपण हरलो.” राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना ‘पनौती’ म्हटले व ‘पनौती’ शब्दाचे विश्लेषण केले.
‘पनौती’ म्हणजे नकारात्मक व्यक्ती किंवा संकटकाल. भाजप ज्यास अमृतकाल वगैरे म्हणत आहे तो संकटकाल आहे व त्याचा पनौतीशी संबंध आहे. ‘साडेसाती’, ‘पनौती’, ‘छोटी पनौती’ हे शब्द भाजपच्या नवहिंदू संस्कृतीशी संबंधित आहेत. मोदी हे काशीचे प्रतिनिधित्व करतात. तेव्हा काशीच्या ‘पंडित’ मंडळींना बोलावून पंतप्रधानांनी पनौतीचे सत्य समजून घेतले पाहिजे. मात्र ‘पनौती’ शब्द भाजपच्या काळजात घुसला व ते घायाळ झाले, पण याच मोदी व शहा यांनी याआधी काँग्रेस, गांधी परिवाराचा उल्लेख ‘राहू-केतू’, ‘राहुकाल’ असा केला आहेच! राहुल गांधी हे ‘पप्पू’ व ‘मूर्खांचे सरदार’ आहेत, अशी दूषणे लावली गेली तेव्हा निवडणूक आयोग भाजप कार्यालयात डोळ्यांवर गोधडी ओढून झोपी गेला होता काय?