मुंबई | आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेले 58 कोटी रुपये घशात घातल्याचा आरोप असलेले किरीट सोमय्या (Kirit Somayya) आणि नील सोमय्या यांच्यावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा टीका केली आहे. हे दोघेही आता अंडरग्राउंड झाले आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीयेत. भूमीगत झाले आहेत. हे दोघेही अँटीसिपेटरी बेलसाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे. पण अशा जामीनासाठी तर चोर, डकैत जातात. देशद्रोही जात नाहीत. आता तेही होऊ लागलंय, अशा तिखट शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला. आयएनएस विक्रांतच्या संवर्धनासाठी गोळा केलेले पैसे काय झाले, या प्रश्नाला उत्तर न देताच किरीट सोमय्या दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेतून निघून गेले. त्यानंतरही त्यांनी उत्तर देणे टाळले. आता ते नॉट रिचेबल असून त्यांना पोलिसांनी समन्स पाठवले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. लवकरच आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना पोलिसांसमोर येऊन त्यांचा जबाब नोंदवावा लागेल तसेच माध्यमांच्या प्रश्नांनाही समोरे जावे लागणार आहे.
आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना संजय राऊत म्हणाले, हे दोघेही अंडरग्राउंड झालेत. तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा उत्तर देत नाहीत. दुसरंच काही बोलतात. लोकांना प्रश्न विचारतात, देशाला विचारतात. तुम्हाला कुणी प्रश्न विचारत असतील तर तुम्ही पळतात. अंडरग्राउंड होतात. भूमीगत… क्रांतीकारी आहेत का ? देशाशी गद्दारी करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली पाहिजे. कायद्याचं राज्य आहे, त्यामुळे पोलीसच हे काम करतील. पोलिसांनी त्यांना समन्स पाठवल्याची माहिती मला मिळाली आहे. जबाब नोंदवा, असे म्हटले आहे. मला कुणीतरी माहिती दिलीय की बाप आणि बेटे (किरीट सोमय्या आणि नील सोमय्या) अँटीसिपेटरी बेलसाठी गेले आहेत. अँटीसिपेटरी बेलसाठी तर चोर, डकैत जातात. पण देशद्रोहीदेखील आता जाऊ लागलेत. ही आश्चर्याची बाब आहे. तुम्ही कुठेही जा, पण जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला हे आंदोलन नव्हते तर तो एक कट होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पुढे ते म्हणाले, ‘ शरद पवार यांचा एसटी आंदोलनाशी काहीही संबंध नाही. ते देशातील एक अनुभवी व्यक्ती आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कुणी उचकवून दिलं. ज्यांच्यामुळे हे घडलं, त्यांना कोणत्या पक्षाचं पाठबळ आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण महाराष्ट्रात अशा प्रकारची राजकारणाची संस्कृती नाही. आज तुम्ही अशा प्रकारे हल्ला घडवून आणत आहात. पण हे लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा काचेच्या घरात राहता.. अशा इशारा संजय राऊत यांनी दिला.
इतर बातम्या-