…तर शिवसेना भवन ताब्यात घेतलं असतं; संजय शिरसाट यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. मुंब्र्यातील शाखेवरील कारवाईवरून राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या टीकेला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. शिरसाट नेमकं काय म्हणालेत? वाचा...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 08 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील मुंब्रा भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर चालवण्यात आला. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेगटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय. आम्हाला जर शाखा ताब्यात घ्यायच्या असत्या. तर आम्ही शिवसेना भवन ताब्यात घेतलं असतं. आमच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही आहे. पण आम्हाला संपत्तीत इंटरेस्ट नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणारे लोक आहोत, असा पलटवार संजय शिरसाटांनी केला आहे.
शिरसाटांचा राऊतांवर पलटवार
मुंब्र्याची ठाकरे गटाची शाखा ही अनधिकृत होती. त्यामुळे त्यावर बुल्डोजर फिरवला गेला. संजय राऊत यांच्याकडे अर्धवट माहिती आहे.शासन अनधिकृत शाखांवर कारवाई करतेच. यांनी बोंबलत राहावं, असं संजय शिरसाट म्हणाले. आम्हाला घटनाबाह्य बोलण्याचा संजय राऊत यांना अधिकार नाही. आम्ही घटनाबाह्य आहो की नाही हे ठरवणारे संजय राऊत कोण? आमच्याबाबत सुप्रीम कोर्ट काय तो निर्णय देईल. प्रत्येकाला इशारा देतात पण काय झालं काही होत नाही, त्यांचे आमदार वाचवण्यासाठी चे स्टेटमेंट आहे त्यांना कोणी विचारत नाही, असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
राऊत काय म्हणाले?
मुंब्र्यातील शाखेवर बुलडोझर फिरवण्याचं पाप केलं पाप केलं. उद्धव ठाकरे हे मुंब्र्यातील शाखेला भेट देणार आहेत. तेव्हा या सगळ्याचा हिशोब होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. त्याला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
पेडणेकर यांच्या ईडी चौकशीवर म्हणाले…
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी होत आहे. यावर शिरसाट यांनी भाष्य केलं. किशोरी पेडणेकर ह्या फक्त मोहरा होत्या. करता करवी ते कुणी दुसरंच होतं. याचे धागेदोरे दूरवर गेलेले आहेत. ज्या ज्या लोकांपर्यंत टेंडरचे पैसे पोहोचलेले आहेत तिथपर्यंत यांचे धागेदोरे दूरवर गेले आहेत. त्या सगळ्यांची नावं समोर आली पाहिजे , ईडी चौकशीमध्येही नाव समोर येतील, असं शिरसाट म्हणालेत.