पवार कुटुंबाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर काय चर्चा होते?; सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्या ग्रुपमध्ये अजितदादा नाहीत
Supriya Sule on Pawar Family WhatsApp Group Ajit Pawar : अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय वाटचालीचे मार्ग वेगळे झाले. मात्र या सगळ्यात पवार कुटुंबात कसं वातावरण आहे? यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर...
देशभरात सध्या लोकसभा निवडणूर होत आहे. पाचव्या टप्प्यातील काल मतदान झालं. महाराष्ट्रातील मतदान काल संपलं. पण या निवडणूक काळात राज्यातील राजकीय परिस्थिती, देशात सरकार कुणाचं येणार, आपल्या मतदारसंघात कोण निवडूण येणार या सगळ्याची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. व्हॉट्सॲप ग्रुपवर तर अक्षरश: चर्चांना उधाण आलं होतं. फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुपवर देखील राजकीय मुद्द्यांवर चर्चा पाहायला मिळाली. शरद पवारांच्या कुटुंबियांच्या ग्रुपवर काय चर्चा झाली असावी? याचबाबत सुप्रिया सुळे बोलत्या झाल्या. पवार कुटुंबियांच्या फॅमिली ग्रुपमध्ये अजितदादा नाहीत, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
अजित पवार व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये का नाहीत?
अजित पवार व्हॉट्सॲप ग्रुपवर अॅक्टिव्ह नाहीत. ते मेसेजला फारशी उत्तरं देत नाहीत. त्यांना ते आवडतही नाहीत. अजित पवार आधीपासूनच फॅमिली ग्रुपवर नाहीत. बाकीचे सगळे फॅमिली ग्रुपवर आहेत. रोहित पवारही या ग्रुपमध्ये नाही. कारण आमच्या पिढीचा आम्हा भावंडांचा एक ग्रुप आहे. रोहित आणि त्याच्या भावडांचा वेगळा ग्रुप आहे. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही राजकारणा पलिकडच्या गप्पा मारतो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पॉन्डिचेरी माझी धाकटी बहिण अश्विनी ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर खूप अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असते. पण तिला राजकारणाचं काहीही देणं-घेणं नाही. कुणी जर काही पाठवलं तर ती त्यावर पॉन्डिचेरीचं एखादं सुंदर फुल शेअर करते. याचा अर्थ की आता बास या गोष्टीवर काही चर्चा करू नका, असं ती सुचवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर काय चर्चा होते?
आमच्या कुटुंबात एक गोष्ट आहे की, एखादी गोष्ट एखाद्याला आवडली नाही तर तर दुसरा लगेच अंगावर जात नाही. तो शांत घेतो. माझी एक बहिण डान्सर आहे तिचा शो असेल तर ती शेअर करते. दुसरी बहिण हंपीला राहाते तिच्याकडे काही घडलं तर ती ते टाकते. यावरच आमची चर्चा होते. आम्हा तिघा- चौघांनाच राजकारणाची आवड आहे. बाकी लोकांना राजकारणात काहीही रस नाही. ते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत. त्यावर आम्ही बोलत असतो, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.