चाकरमान्यांसाठी खुशखबर, मुंबई-गोवा मार्गाचे विघ्न टळणार, एक मार्गिका गणपतीपूर्वीच सुरु होणार
गणपतीच्या आधी मुंबई ते गोवा मार्गाची एक मार्गिका तयार करण्यात येणार आहे. तर सहा ते आठ महिन्यात या महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबई : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई ते गोवा महामार्गाची ( Mumbai-Goa Highway ) एक सिंगल लेन सुरु केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवाच्या आधी ही लेन तयार केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांची ( Konkan Railway ) भलीमोठी प्रतिक्षा यादी ( Railway Waiting List ) हाती पडलेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. आता रस्ते मार्गाने एसटी ( MSRTC ) आणि खाजगी वाहनांसाठी गोवा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.
दरवर्षी चाकरमानी गणपतीच्या सणाला कोकणात आपल्या गावी जात असतात. यंदा गणपतीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने तब्बल 208 रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. परंतू बहुतांशी प्रवाशांच्या हाती वेटींगची तिकीटे पडली आहेत. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. यंदा 19 सप्टेंबरला गणपतीचे आगमन आहे. निदान या तारखेपर्यंत तरी मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ची एक लेन सुरु करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
हेच ते ट्वीट पाहा…
यंदा गणेशोत्सवादरम्यान कोकणवासीयांना कोणतीही समस्या उद्भवणार नाही. मुंबई-गोवा महामार्गावरील हा सिंगल लेन रस्ता गणेशोत्सवापूर्वीच पूर्ण होणार आहे.
गणपती बाप्पा मोरया !#Panvel #MumbaiGoaHighway #BJP #BJP4Maharashtra #BJP4महाराष्ट्र #Maharashtra#बीजेपी #Dombivali #महाराष्ट्र… pic.twitter.com/KZTt6mRSqN
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) July 14, 2023
मुंबई ते नागपूर हा राज्यातील सर्वात मोठी एक्सप्रेसवे तयार झाला तरी मुंबई ते गोवा महामार्ग पूर्ण झाला नसल्याची टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या महामार्गाची एक मार्गिका गणपती पूर्वी सुरु करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम परशूराम घाटात सुरु आहे. या रस्त्याची लांजा ते राजापूर दरम्यान पावसाने आणखी दयनीय अवस्था झाली आहे. सहा ते आठ महिन्यात या महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.