एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या महिलांच्या पर्स चोरी करुन जमवले 4 लाख, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घातल्या बेड्या
कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेने मेल एक्सप्रेस गाड्यांमधून महिलांच्या पर्स आणि महागड्या वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीने सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी ४,५६,४३० रुपयांचा मुद्देमाल, ज्यात सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.

कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मेल एक्सप्रेस गाड्यांमधून महिला प्रवाशांच्या पर्स आणि महागड्या वस्तू चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी या कारवाईत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 4 लाख 56 हजार 430 रुपयांचे सोन्याचे दागिने, मोबाईल, आयपॅड आणि घड्याळे जप्त केली आहेत. सहीमत अंजूर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नवी मुंबईतील रबाळेचा रहिवासी आहे.
पर्स, महागड्या वस्तू आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी
गेल्या काही दिवसांपासून मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या पर्स, महागड्या वस्तू आणि सोन्याचे दागिने चोरी होण्याच्या अनेक घटना घडत होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी निझामुद्दीन एक्सप्रेसमधील एका महिलेची पर्स चोरी झाल्याची तक्रार डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. निझामुद्दीन एक्सप्रेस ही मंगलोर रेल्वे स्टेशनवरुन निघाली होती. 22 मार्चला याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक विशेष टीम तयार केली.
सहा गुन्ह्यांची कबुली
यानंतर काही पोलिसांनी साध्या वेषात स्टेशन परिसरात गस्त सुरू केली. याप्रकरणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी बदलापूर शहर हद्दीतून आरोपी सहिमत अंजूर शेख (29) याला ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान त्याने सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 4,56,430 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, 6 मोबाईल फोन, एक आयपॅड आणि घड्याळांचा समावेश आहे.
अधिक तपास सुरु
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपआयुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. गुन्हे शाखेचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.