पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी माणसं आणण्याचं टार्गेट ठरलं, शिंदे गटाला किती लोकं आणण्याचं टार्गेट?
गुरुवारी होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा न भूतो न भविष्यती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीचं रणशिंग याच सभेतून फुंकलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 19 जानेवारी रोजी मुंबईला येणार आहेत. मुंबईत ते विविध विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा मुंबई दौरा होत आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधानांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर भाजपने शिंदे गटालाही माणसं आणण्याचं टार्गेट दिलं आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाचे नेतेही कामाला लागल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 19 तारखेला बीकेसी येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची काल रात्री बीकेसी मैदानावर संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागातून मोठ्या प्रमाणात लोकांना बीकेसीवर घेऊन येण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी देण्यता आली आहे.
या सभेसाठी भाजपला 1 लाख तर शिंदे गटाला 50 हजार कार्यकर्ते आणण्याचं टार्गेट दिलं आहे. शिंदे गटाचं मुंबईत फारसं अस्तित्व नाही. त्यामुळे शिंदे गटाला मुंबईतून माणसं आणणं कठिण होणार असल्याचं चित्रं आहे.
त्यामुळे शिंदे गटाकडून ठाणे जिल्ह्यातून अधिकाधिक माणसं आणली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या सभेला माणसं आणण्याचे फर्मान सोडलं आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या १९ जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकार्यासोबत मंत्री @dvkesarkar जी तसेच आमदार @ShelarAshish जी यांनी बैठक घेऊन दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ##MumbaiAwaitsModi pic.twitter.com/YQTTrDQnna
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) January 15, 2023
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनीही ट्विट करून कालच्या सभेची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 19 जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या सभेच्या नियोजनाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री दीपक केसरकर आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी बैठक घेतली. या दोन्ही नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, असं ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलं आहे.
दरम्यान, गुरुवारी होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा न भूतो न भविष्यती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीचं रणशिंग याच सभेतून फुंकलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकास योजनांचे लोकार्पण करून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याने स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दावोसचा दौरा रद्द केला आहे. तर, मुंबईतील पंतप्रधानांच्या सभेची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर देण्यात आली आहे.