सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 1 कोटीची भरपाई द्या, ॲड. प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Prakash Ambedkar meet CM Devendra Fadnavis : परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली.
परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली. तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली.
ॲड. आंबेडकर यांनी केल्या या मागण्या
1) परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी.
2) सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्या.
3) परभणीत पोलीसांनी क्रूरतेने केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करण्यासाठी आणि पुरेशी भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करा.
4) 1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगावच्या अभिवादन सोहळ्यापूर्वी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि चुकीची माहिती भडकावण्याच्या कोणत्याही प्रयत्नांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते हाणून पाडण्यासाठी पोलीसांना निर्देश द्यावेत.
5) आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना रद्द करा आणि पूर्वीची प्रणाली पुन्हा सुरू करावी.
I met the Hon’ble Chief Minister Devendra Fadnavis this morning.
I placed certain demands —
1️⃣ Increase the 𝐜𝐨𝐦𝐩𝐞𝐧𝐬𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲 𝐨𝐟 𝐒𝐨𝐦𝐧𝐚𝐭𝐡 𝐒𝐮𝐫𝐲𝐚𝐰𝐚𝐧𝐬𝐡𝐢 𝐭𝐨 ₹𝟏 𝐜𝐫𝐨𝐫𝐞;
2️⃣ Provide 𝐞𝐦𝐩𝐥𝐨𝐲𝐦𝐞𝐧𝐭 𝐭𝐨 𝐚 𝐟𝐚𝐦𝐢𝐥𝐲… pic.twitter.com/4czPp3KIE7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 28, 2024
परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे त्यांनी ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कशामुळे?
एका मनोरूग्णाने 10 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा रेल्वे स्थानकाजवळ संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. त्यानंतर शहरात हिंसाचार उसळला. घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली. त्यादरम्यान आक्रमक तरुणांनी वाहनांची, दुकानांची तोडफोड केली. घटनेच्या दोन दिवसानंतर पोलीसांनी 12 डिसेंबर रोजी सोमनाथ याच्यासह 300 लोकांना ताब्यात घेतले होते. तर 72 तासानंतर न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर सूर्यवंशीने छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सूर्यवंशीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.