12,000 कोटींचा प्रकल्प, पावसाळ्याआधीच लागली गळती? भिंतींवर काळ्या डागांचे साम्राज्य
मुंबईमधील बहुचर्चित 12,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पातील बोगद्याला गळती लागली आहे. दोन महिन्यापूर्वीच या प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केले होते. 10 ते 11 जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुंबई : समुद्राखाली बांधण्यात आलेल्या देशातील पहिला रस्ता मुंबईत बांधण्यात आला आहे. सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी बोगदे बांधले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावर्षी 11 मार्च रोजी उद्घाटन झाले. मात्र, याच महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडवरून सरकारवर टीका होत आहे. उद्घाटन होऊन तीन महिने पूर्ण झाले नसताना कोस्टल रोडवरील बोगद्यात पाणी शिरू लागले आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला तीन महिनेही पूर्ण झालेले नाहीत. अशातच आता ओलसरपणामुळे अनेक ठिकाणी भिंतींवर काळे डाग पडले आहेत. बोगद्यातील ही गळती कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा तपास सुरू आहे.
मुंबईकरांना पूर्वी वरळी येथून मरीन ड्राइव्हला जाण्यासाठी 40 मिनिटे लागायची. परंतु, मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन झाल्यानंतर हे प्रवासी अंतर अवघ्या 9 ते 10 मिनिटांवर आले. मात्र, पावसाळ्याच्या दोन आठवडे आधीच मुंबई कोस्टल रोड बोगद्यातून गळती सुरू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सीएम शिंदे यांनी कोस्टल रोड टनेलला भेट दिली
मुंबईत मान्सून येण्यास अवघे काही आठवडे उरले आहेत. त्यामुळे कोस्टल रोड बोगद्यातून गळती झाल्याची बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. बोगद्याची पाहणी करून मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गळती होणारा भाग काही दिवसांत भरला जाईल. पावसाळ्यात येथे पाणी दिसणार नाही असे स्पष्ट केले. दोन तीन ठिकाणी गळती सुरु आहे. गळतीची चौकशी केली जाईल. बोगदा तज्ञांना भेटून माहिती घेतली. त्याच्या मूळ संरचनेला कोणताही धोका नाही. विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ते भरले जाईल. यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल. प्रवाशांना कोणतीही अडचण होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
समुद्रसपाटीपासून 17 ते 20 मीटर खाली आहे बोगदा
10 एप्रिल रोजी हाजी अली कोस्टल रोडच्या पादचारी अंडरपासमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर महापालिकेवर बरीच टीका झाली होती. त्यामुळे आता पावसामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे कोस्टल रोडचा हा बोगदा पावसाळ्यात किती सुरक्षित असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. 12.19 मीटर व्यासाच्या या बोगद्यात एकेरी वाहतूक सुरू आहे. समुद्रसपाटीपासून हा बोगदा 17 ते 20 मीटर खाली आहे. 11 मार्च रोजी एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या रस्त्यावरून आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.