भंडारा : जिल्ह्यात 1 हजार 251 गावे अंधारात जाण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यातील या गावांतील पथ दिव्यांची थकबाकी (arrears) सतत वाढत आहे. ही पथदिव्यांची थकबाकी 12 कोटी रुपयांच्या वर पोहचली आहे. महावितरणने पथदिव्यांची वीज खंडित (power outage) करण्याचा सपाटा लावला आहे. ऐन पावसाळ्याच्या (rains) तोंडावर गावे अंधारात गेल्याने लोकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. भंडारा महावितरण सुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. थकबाकी कोट्यवधीच्या घरात असल्याने ती वसूल करण्यासाठी महावितरण येनकेन प्रकारे प्रयत्न करत आहे. यात महावितरणची डोकेदुखी ठरली. ती पथदिव्यांची थकबाकी.
भंडारा जिल्ह्यात 1 हजार 251 गावांची पथदिव्यांची थकबाकी आहे. यात भंडारा उपविभागाचे 194 गावे, भंडारा अर्बनचे 88 गावे, मोहाडी तालुक्यातील 130 गावे, पवनी तालुक्यातील 195 गावे, तुमसर तालुक्यातील 219 गावे, लाखांदुर तालुक्यातील 149 गावे, लाखनी तालुक्यातील 149 गावे, साकोली तालुक्यातील 127 गावांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत 7 गावांची पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील 2 , तुमसर तालुक्यातील 4, तर लाखनी तालुक्यातील 1 गावांचा समावेश आहे. आता ही गावे अंधारात गेली आहे. या गावात रात्री 8 नंतर कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती निर्माण होते. आता ऐन पावसाल्यात ही स्थिती आहे. भंडारा महावितरण आर्थिक संकट पुढे करत वीज पुरवठा खंडित करण्याची आपली भूमिका योग्य असल्याचे समर्थन करीत आहे. अशी माहिती महवितरणचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी दिली.
ग्रामपंचायतचे उत्पन्न अत्यल्प आहे. सुरुवातीपासून गावातील पथदिव्यांचे वीज बिल राज्य सरकारकडून भरण्यात येते. मात्र मागील काही वर्षापासून शासन दरबारातून वीज बिल भरण्यात आले नाही. वीज संकट उभे ठाकले आहे. वीज खंडित करण्याचा सपाटा लक्षात घेता सरपंच संघटना आक्रमक झाल्यात. महावितरणच्या या वीज खंडित करण्याच्या भूमिकेविरोधात आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न अत्यल्प असल्याचे कारण देत पथदिव्यांची वीज बिल भरु शकत नसल्याची भूमिका सरपंच संघटनांनी यापूर्वी घेतली. असं मत हरदोलीचे सरपंच सदाशीव ढेंगे व धोपचे सरपंच तुलसी मोहतुरे यांनी व्यक्त केलं.