Baba Siddique Case : हत्येमागे बिल्डर लॉबी? झिशान सिद्दीकींचा खळबळजनक आरोप, पोलीस लपवताय काय?
Baba Siddiqui Murder Case : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईला क्लीनचिट दिली. तर अनमोल बिश्नोई मास्टरमाईंड असल्याचा दावा केला. या सर्व प्रकरणात झिशान सिद्दीकींनी पोलिसांवर खळबळजनक आरोप केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत कार्यालयाबाहेर हत्या झाली होती. या खूनप्रकरणात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लाँरेन्स बिश्नोई याला क्लीनचिट दिली. तर त्याचा लहान भाऊ अनमोल हा यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला. पण या संपूर्ण तपासावर त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा दावा त्यांनी केला. एसआरए विकास प्रकल्पातून ही हत्या झाल्याचा दावा होत असताना त्यादृष्टीने तपास का करण्यात आला नाही. ज्यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही. जे संशयित आहेत, त्यातील काही बांधकाम व्यावसायिक आहेत, असा आरोप झिशान यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
झिशान सिद्दीकी तपासावर नाराज
झिशान सिद्दीकी पोलिसांच्या तपासावर नाराज आहेत. मुंबई पोलीस खूनाचा आरोप अनमोल बिश्नोई याच्यावर टाकून मोकळे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या बांधकाम व्यावसायिकांवर आपण संशय घेतला, त्यांना साधं चौकशीला सुद्धा बोलावण्यात आलं नसल्याचा आरोप झिशान यांनी केला. पोलिसांनी अनमोल बिश्नोई हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. शुभम लोणकर आणि झिशान यांनी हत्या घडवून आणले असे सांगितले. दोषारोपपत्रात एकूण 29 आरोपी आहेत. मास्टरमाईंड आणि इतर आरोपी अजून अटकेत नाहीत. मग त्यांची अटक नसताना पोलिसांनी ही थेअरी कशी मांडली? असा सवाल ही त्यांनी केला.
तीन आरोपी अद्याप फरार
12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला. त्यात सिद्दीकी यांना गोळी लागली. यातील दोन शूटरला घटनास्थळीच पकडण्यात आले. तर तिसरा पळाला. अकोल्यातील शुभम लोणकर याने हत्या केल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकली होती. त्याने शूटर्सला शस्त्र पुरवली होती.
पोलिसांनी प्रकरणात 4590 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात या हत्येसाठी एकूण 29 जणांना दोषी ठरवले आहेत. त्यातील 26 जणांना अटक केली आहे. तर मोहम्मद यासीन अख्तर उर्फ सिंकदर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई हे फरार आहेत. याप्रकरणात पोलिसांनी 180 साक्षीदार तपासले आहेत.