थर्टीफर्स्टसाठी तुम्हीच नाही, पोलीसही सज्ज, मुंबईत 100 ठिकाणी नाकाबंदी, अनेक मार्ग बंद, रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत काय कारवाई?
दोन वर्षापासून कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी बंद करण्यात आली होती. त्याच्या जागी रक्ताचे नमुने तपासले जात होते.
मुंबई: थर्टीफर्स्टला अवघे दोन दिवस बाकी आहेत. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर थर्टीफर्स्टचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. फक्त मुंबईकरच नाही. तर मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीसही थर्टीफर्स्टच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. थर्टीफर्स्टचा यंदा मोठा जल्लोष होणार असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. तर रॅश ड्रायव्हिंगपासून ते तळीरामांपर्यंत सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. तब्बल दोन हजार वाहतूक पोलीस शहरात तैनात असणार आहेत.
सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकीकडे मुंबईकरांनी जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे शहरात दोन नंतर होणाऱ्या सेलिब्रेशनमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलिसांनीही आपली तयारी सुरू केली आहे. मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून 4 पोलीस उपायुक्त, 2000 वाहतूक पोलीस कर्मचारी, वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.
शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात येणार असून शहरातील अनेक ठिकाणी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याच बरोबर अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून शहराच्या 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी बंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षात फक्त सात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती.
मात्र यावेळेस वाहतूक पोलिसांनी पुन्हा ब्रेथ ॲनालायझर तपासणी सुरू करत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर हॉटेल ,बार आणि सेलिब्रेशनच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक पार्किंगसाठी संबंधित आस्थापनाला पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील हे मार्ग राहणार बंद
मरीन ड्राईव्ह परिसरातील नेताजी सुभाष रोड हा रस्ता नरिमन पॉईंटपासून मुंबई प्रिन्सेस फ्लायओव्हरपर्यंत उत्तर वाहिनी आवश्यकता लागली तर बंद करणार आहेत. त्याचप्रमाणे श्यामप्रसाद मुखर्जी चौक ते गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारा रस्ता पुढे रेडिओ क्लबकडे जाणारा रस्ता एक दिवसाच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या रस्त्यावर राहणार नो पार्किंग झोन
गेटवे ऑफ इंडियाकडे जाणारे रस्ते, नेताजी, सुभाष रोड, मरीन ड्राईव्ह, गफारखान रोड, वरळी सी फेसला लागून असलेला रस्ता, जुहू तारा रोड या रस्त्यांवर सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत नो पार्किंग झोन राहणार आहे.
किती वाहतूक पोलिसांनी राहणार तैनात?
वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, चार पोलीस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलीस आयुक्त, 2000 वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतूक वार्डन, स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.
रॅश ड्रायव्हिंग, ओव्हर स्पीड, ड्रंक अँड ड्रायव्हिंगसाठी मुंबईमधील 100 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. कोणीही रॅश ड्रायव्हिंग, ओवर स्पीड, ड्रंक अँड ड्रायव्हिंग केली तर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
ब्रेथ ॲनालायझर तपासणी होणार
दोन वर्षापासून कोरोनामुळे मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाची ब्रेथ ॲनालायझर तपासणी बंद करण्यात आली होती. त्याच्या जागी रक्ताचे नमुने तपासले जात होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षात मुंबई वाहतूक पोलिसांकडून फक्त सात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात आली होती.
मात्र यावेळेस वाहतूक पोलीस पुन्हा ब्रेथ ॲनालायझर तपासणी करून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या कारवाई करणार आहे, असं मुंबई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितलं.