corona new variant XE in mumbai: भारतात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला, मुंबईत आढळली XE आणि कप्पाची पहिली केस; आरोग्य खात्याचे धाबे दणाणले
मुंबईतील 230 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘ओमायक्रॉन’ चे 228 अर्थात 99.13 टक्के रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट जरी (Corona Third Wave) ओसरली असतली, तरीही मुंबई महापालिका प्रशासन अजूनही गाफील नाही. कारण काही देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेकडून (BMC) अजूनही काही महात्वाच्या चाचण्या करण्यात येत आहे. अशा चाचण्यांचा एक महत्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. यात मुंबईत तब्बल 99.13 टक्के रुग्णांमध्ये ओमायक्रॉन (Omicron) असल्याचे समोर आले आहे. तर कोरोनामुळे पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE आणि Kappa चे मुंबईत रुग्ण आढळून आले आहे. XE व्हेरिएंटचे हे देशातील पहिले प्रकरण आहे. जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान एकूण 376 नमुने घेण्यात आले, त्यापैकी 230 मुंबईतील आहेत. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीची ही 11वी बॅच होती. 230 पैकी 228 नमुने ओमिक्रॉनचे आहेत, उर्वरित – 1 कप्पा व्हेरिएंट आणि XE व्हेरिएंटचा आहे. त्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा अलर्ट मोडवर आला आहे. कोविड 19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या आदेशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
Maharashtra | Results of 11th test under the Covid virus genetic formula determination – 228 or 99.13% (230 samples) patients detected with Omicron. One patient affected by ‘XE’ variant and another is affected by the ‘Kapa’ variant of COVID19: Greater Mumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) April 6, 2022
महापालिकेची अधिकृत माहिती
मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात स्थित नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब व पुणे स्थित राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या अकराव्या चाचणी तुकडीचा (बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण 376 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील230 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 230 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष जाहीर करण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आलीय.
गाफील राहू नका
कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात येवून जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. असे असले तरी जगातील अनेक भागांमध्ये कोविड संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मास्कचा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहेत.
लसीकरण पूर्ण होणे गरजेचे
सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करुन घेणाऱयांना व कोविड प्रतिबंधक नियम पाळणाऱयांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळते तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहेत.
BMC Elections : मुंबई महापालिकेतील घराणेशाही संपवा, फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन