शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज! निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा
Farmer Electricity | राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज वीज मिळणार आहे. राज्य सरकारने आज याविषयीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प पण त्यांनी सोडला. काय केली त्यांनी घोषणा..
मुंबई | 7 March 2024 : राज्यातील शेतकऱ्यांना आता 24 तास अगदी स्वस्तात वीज मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना अवघ्या दोन रुपयांत वीज मिळेल. या सर्व योजनेचा घोषवारा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल. तर महावितरण ही नवरत्न कंपनी करण्याचा संकल्प ही त्यांनी सोडला. वीज कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्वासन पण त्यांनी दिले.
दीड वर्षात चमत्कार
राज्य सरकारने आतापर्यंत दीड लाख पंप दिले आहेत. पण आता आपण या एकाच वर्षांमध्ये 8 लाख सोलर पंप मंजूर करुन निधीचा पुरवठा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मागेल त्याला सोलर पंप देण्यात येणार आहेत. सध्या पाच लाख सोलरची मागणी असून राज्य सरकारकडे आठ लाख सोलर पंप असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांचे रात्रीचे वीजेचे संकट आम्ही संपवू असे वचन दिले होते. त्याप्रमाणे ते आम्ही पूर्ण करु. दीड वर्षात आता 50 टक्के शेतकऱ्यांचे हे संकट संपविण्याचे अभिवचन त्यांनी दिले.
स्वस्तात मिळणार वीज
शेतकऱ्यांना स्वस्तात वीज मिळणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. ही वीज आता 24 तास उपलब्ध असेल. शेतकऱ्यांन 2 रुपये 87 पैसे ते 3 रुपये 10 पैशात वीज मिळणार आहे. त्यासाठी पूर्वी राज्य सरकारला साडेसात रुपयांचा खर्च येतो. हा खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच राज्यात विजेची पण बचत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी केवळ 11 महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. अजून 18 महिने काम पूर्ण करण्यासाठी देण्यात आले आहे. एकूण कृषी फीडर पैकी 50 टक्के फिडर हे पुढच्या दीड वर्षांमध्ये सोलर होतील. 50% फीडर्सचे काम पूर्ण होताच, महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की ज्यामध्ये 100% कृषी जी काही वीज निर्मिती आहे ही सोलरवर त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होईल आणि खर्चाची बचत होईल, असे ते म्हणाले.
महावितरण होणार नवरत्न
सध्या सबसिडीवर राज्य सरकार 13000 कोटी रुपये खर्च करते. सौर पंपामुळे हा खर्च वाचेल. तर औद्योगिक वीजेचा दर पण काही प्रमाणात बदलता येतील. सध्या जी ॲग्री सोलर कंपनी काढलेली आहे.त्याच्या आधारावर पुरत्या तीन ते चार वर्षांमध्ये महावितरण कंपनीला नवरत्न कंपनीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर 25000 रोजगार निर्मिती होणार असल्याचे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी सांगितले.