26/11: धावत्या मुंबईला थांबायला लावणारा हल्ला! असंख्य जखमा, रक्तपात अन् दहशतवाद्यांशी दोन-हात!
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 13 वर्ष उलटली. आजही 26 नोव्हेंबर हा दिवस उजाडला की मुंबईवर हल्ला करून अवघ्या देशाला वेठीस धरणाऱ्या त्या काळ्या दिवसाच्या आठवणी ताज्या होतात. मुंबईच्या काळजात आजही त्या जखमा भळभळत आहेत, पण अशा कित्येक जखमा झेलत जगण्याच्या शर्यतीत पुढे राहते तीच खरी मुंबई, हे वारंवार सिद्ध होते. या हल्ल्यानंतरही मुंबईने हेच तर दाखवून दिले.
मुंबई हल्ल्याला आज 13 वर्ष उलटली. जगण्याच्या उत्स्फूर्त इच्छेनं धावणाऱ्या मुंबईची दोर अचानक थांबवणाऱ्या त्या हल्ल्यानं (Mumbai Attack) आजही अनेकांना धडकी भरते. देशाची आर्थिक राजधानी, असंख्य लहान मोठ्या उद्योगांनी गजबलेली मुंबई संध्याकाळी तर आणखीच मोहक, मायावी रुप घेते. अशाच एका संध्याकाळी, आजच्या 26 नोव्हेंबर (26/11) या दिवशीच, 13 वर्षांपूर्वी सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी (Terrorist attack) मुंबानगरीतल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करत अवघ्या शहराला अन् देशाला वेठीस धरलं.
मायानगरी मुंबईच्या मर्मस्थळावर घाव
26 नोव्हेंबर 2008 रोजी संध्याकाळी मायानगरी मुंबई आपाल्याच नादात रमलेली होती. एवढ्यात महत्त्वाचे स्टेशन सीएसटीवर दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लिओपोल्ड कॅफेवर सुरुवातीला हा गोळीबार सुरु झाला. त्यावेळी हा दहशतवादी हल्ला आहे, असं कुणाला वाटलंही नव्हतं. पण एकापाठोपाठ एक मुंबईच्या विविध उपनगरांतून गोळीबाराच्या बातम्या येऊ लागल्या. एरवी रात्री 12, 01 वाजेपर्यंत बिनधास्त प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचं जग अचानक दहशतीत बदललं. देशाच्या आर्थिक राजधानीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. सीएसटी स्टेशनवर त्यावेळी असंख्य प्रवासी होते. त्यांच्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. हँड ग्रेनेडही टाकले. इथं सुमारे 54 निष्पाप प्रवासी मृत्यूमुखी पडले. गोळीबार सुरु झाल्यावर जी पळापळ झाली, त्यातही अनेकजण गंभीर जखमी झाले. सीएसटीवरचा हल्ला अजमल आमिर कसाब आणि इस्माइल खान या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.
ताज हॉटेलवरही धुमाकुळ, जवानांचे शर्थीचे प्रयत्न
26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवरही लक्ष्य साधलं. तेथील अनेक लोकांना दहशतवाद्यांनी बंधक बनवलं. यात सात विदेशी नागरिकांचा समावेश होता. ताज हॉटेलच्या हेरिटेज विंगला आग लावण्यात आली. 27 नोव्हेंबरला सकाळी एनएसजीचे कमांडो दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी तिथे पोहोचले. आधी हॉटेलमधील बंधक नागरिकांना सोडवण्यात आलं. नंतर 29 नोव्हेंबरपर्यंत दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु होती. 29 नोव्हेंबरला सकाळी ही चकमक संपली.
मध्यरात्रीपर्यंत अवघ्या मुंबईत गोळीबार अन् दहशत
सीएसटी स्टेशन, ताज हॉटेलसह हॉटेल ओबेरॉय, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पीटल आणि दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणांवरही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला होता. 26 नोव्हेंबरच्या त्या मध्यरात्रीपर्यंत मुंबईतल्या अनेक ठिकाणी गोळीबार सुरु झाले होते. यात दक्षिण मुंबई पोलीस मुख्यालय, माझगाव डॉक, नरीमन हाऊस, विलेपार्ले, गिरगाव चौपाटी, ताडदेव आदी ठिकाणांवर हल्ले झाले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह निमलष्करी दलही मैदानात उतरले होते. पण एकदाच अनेक ठिकाणी हल्ले झाल्यामुळे किती दहशतवादी आहेत, याचा अंदाज घेणं कठीण झालं होतं.
मुख्य आरोपी कसाबनं पाकिस्तानचं कारस्थान उघड केलं…
सीएसटी टर्मिनसमध्ये गोळीबार करून रक्ताची होळी खेळणारा भयंकर दहशतवादी अजमल आमिर कसाब पोलिसांशी झालेल्या चकमकीनंतर ताडदेव परिसरात जिवंत पकडला गेला. त्यावेळी तो गंभीर जखमी होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता, हे त्यानेच त्यावेळी उघड केलं. तसेच हल्ल्यात मारल्या गेलेल्या साथीदारांचीही नावं सांगितली. कसाबवर नंतर खटला चालला आणि त्याला फाशी देण्यात आली.
10 दहशतवादी, पाकिस्तानात कट रचला
मुंबईवर एकाच वेळी अनेक ठिकाणी झालेल्या या हल्ल्याचा कट अत्यंत शांत डोक्यानं रचला गेल्याचं दिसून आलं होतं. यात अनेक दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. मात्र कसाबच्या जबाबानंतर फक्त 10 दहशतवाद्यांनाच मुंबईला खिळखिळं करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं, हे उघड झालं. पाकिस्तानातच त्यांना ट्रेनिंग दिली देली. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजीच ते सागरी मार्गानं भारतात आले होते. ज्या बोटनं ते भारतात आले, ती बोट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळली.
शहीद अन् जवानांच्या शौर्याच्या ऋणात अवघा देश
26/11 चा हा हल्ला मुंबईचे जिगरबाज पोलीस अन् शूर जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी हाणून पाडला. पण हल्ल्यात सामान्य नागरिकांसोबतच पोलीस दलाचंही कधीही भरून न निघणारं नुकसान झालं. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी एक पोलीस व्हॅनवर ताबा मिळवला. ती व्हॅन घेऊनच ते रस्त्यावर फिरत नागरिकांवर बेछूट गोळीबार करत सुटले होते. त्यानंतर दहशतवादी हीच व्हॅन घेऊन कामा हॉस्पीटलमध्ये घुसले. तेथेच चकमकीदरम्यान एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसआय अशोक कामटे आणि विजय साळसकर यांना गोळी लागली होती. यात या तिघांचाही मृत्यू झाला. मुंबई हल्ला म्हटलं की दहशतवाद्यांशी झुंज देत धारातीर्थी पडलेल्या या तिघांच्या शौर्यासमोर आधी नतमस्तक व्हावं वाटतं.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी 200 एनएसजी कमांडो आणि 50 जवानांना मुंबईत पाठवण्यात आले होते. तसेच सैन्याच्या पाच तुकड्याही विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.पोलीस, एटीएस आमि एनएसजीमधील एकूण 11 जणांना वीरगती प्राप्त झाली होती. यात उपरोक्त तिघांसह, एसीपी सदानंद दाते, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, एनकाउंटर प्रेशलिस्ट एसआय विजय साळसकर, इन्स्पेक्टर सुशांत शिंदे, एसआय प्रकाश मोरे, एसआय दुदगुडे, एएसआय नानासाहब भोसले, एएसआय तुकाराम ओंबळे, कॉन्स्टेबल विजय खांडेकर, जयवंत पाटील, योगेश पाटील, अंबादास पवार आणि एमसी चौधरी यांचा समावेश होता. यासह 137 नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर 300 जखमी झाले होते. या हल्ल्याच्या सूत्रधाराला फाशी देण्यात आली.
मुंबई, तुझ्या जिद्दीला सलाम!
26/11 च्या हल्ल्याला तब्बल 13 वर्ष उलटलीत. प्रत्येक मुंबईकराच्या मनात ते घाव आजही जिवंत आहेत. आजही तो दिवस आठवला की भल्या-भल्यांना धडकी भरते. बॉम्बस्फोट, पावसाचं थैमान आदी घटनांनी याआधीही मुंबईची चाकं थांबली होती. पण असल्या घावांना जुमानतेय ती मुंबई कुठली. मुंबईचं रक्तच काही औरय. तिला जगायचं असतं, जिंकायचं असतं. धावायचं असतं, येईल त्या संकटांना धीरानं सामोरं जायचं असतं. कसल्याही किंतु-परंतुंना न जुमानता, मनात आढे-वेढे न घेता, जगण्याच्या उत्सवात इथल्या प्रत्येकाला सहभागी व्हायचं असतं. याच गुणानं असले हल्ले म्हणजे तिच्या चेहऱ्यावर लावलेल्या काळ्या तीटासारखे भासतात. आज 26/11 च्या निमित्तानं मुंबईला पुन्हा एकदा सलाम!
इतर बातम्या-