नवी दिल्ली (संदीप राजगोळकर, दिल्ली प्रतिनिधी TV9 मराठी) : आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचे 288 पानांचं एक पुस्तक, मॅडम कमिशनर हे नुकताच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकामधून त्यांनी कसाबच्या फाशीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. आर्थर रोड कारागृहाला इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची सुरक्षा होती. या सुरक्षेमध्येच कसाब रोज व्यायाम करायचा तो शांत असायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांन कधीच बिर्याणी खाल्ली नाही असा मोठा खुलासा आयपीएस अधिकारी मीरा यांनी केलाय. “ज्यावेळी तपास अधिकारी म्हणून मी त्याला प्रश्न करत होते त्यावेळी तो हसायचा. कसाबबद्दल तुरुंग अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या पण कसाबला पकडण्यापासून ते फाशीपर्यंत भारत सरकारने कायदा पाळून सर्व प्रक्रिया पूर्ण केली” असेही मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटल आहे.
एकदा तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी मला पुण्यातील सर्किट हाऊसला बोलावून घेतलं आणि फाशीबाबतची सगळी प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी पाटील यांनी जगातील काही देश कसाबच्या फाशीबाबत हस्तक्षेप करू शकतात अशी माहिती दिली. त्यानंतर मी दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून पूर्ण प्लॅन तयार केला ज्यामध्ये योगेश देसाई आणि सुनील धमाल हे अधिकारी होते असं मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिलं आहे. यापूर्वी राज्यात तीस वर्षांपूर्वी फाशी झाली होती. अनेक तुरुंग धूळ खात होते, त्यामुळे कसाबला फाशी देताना अनेक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं होतं असं त्यांनी लिहिलय.
बोरवणकर यांनी काय कबुली दिली?
कसाबला मुंबईतून पुण्यात आणताना अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यावेळी काही अधिकारी माझ्यावर नाराज झाले होते, पण फक्त दहा लोकांना माहीत होतं की कसाबला पुण्याला आणलं जातं आहे त्यातच मुंबईतल्या एका रिपोर्टरलाही याची कुणकुण लागली होती. त्याने आर्थर रोड प्रशासनाकडे आणि थेट आर आर पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर त्या रिपोर्टरने मलाच फोन केला होता. मी पण नकार दिला. मात्र ही माहिती लीक झाल्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास काही प्रमाणात कमी झाला होता अशी कबुली बोरवणकर यांनी दिली.
‘इतका मोठा दहशतवादी त्यावेळी लहान वाटत होता’
फाशीच्या आदल्या दिवशी 20 तारखेला मी येरवडा तुरुंगात जाऊन आले. सर्व प्रोटोकॉल आणि सुरक्षा व्यवस्था बाजूला ठेवली. मी ब्लेझर घातला. युनिफॉर्म न घालता जाऊन सगळ्या सुरक्षेची पाहणी केली आणि आढावा घेतला होता असं बोरवणकर म्हणाल्या. फाशी दिवशी अजमल अजमल कसाब हा एखाद्या लहान मुलाप्रमाणे दिसत होता. इतका मोठा दहशतवादी त्यावेळी लहान वाटत होता, कारण त्याने व्यायाम करून आपलं वजन कमी केलं होतं. ज्यावेळी कसाबला फाशी झाली त्यानंतर याची माहिती मीच माझ्या मोबाईल वरून तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांना दिली होती असं बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिलं आहे.