दावोस : जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील 23 कंपन्यांशी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे 66 हजार जणांना रोजगार (Employment) मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आज झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये 55 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान (Information technology), डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे. दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण 30379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रात रोजगारवाढीला चालना मिळणार असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 आवृत्या आयोजित करण्यात आल्या असून, त्यामाध्यमातून आजतगायत 121 सामंजस्य करार झाले. त्यातून राज्यात एकूण 2.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे 4 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे देखील देसाई यांनी म्हटले आहे.
या करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.