Health : तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शन; महापालिकेच्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर
तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शनचा (Hyper tension) आजार असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने हे सर्वेक्षण (Survey) करण्यात आले.
मुंबई : तब्बल 34 टक्के मुंबईकरांना हायपर टेन्शनचा (Hyper tension) आजार असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार महापालिकेच्या वतीने हे सर्वेक्षण (Survey) करण्यात आले. या सर्वेक्षणात पाच हजार व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आता मुंबईकरांना तणावमुक्त (Stress free) करण्यासाठी महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबईकरांचा तणाव कमी करण्यासाठी अशा वर्कर्स आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी जाऊन ब्लड प्रेशरची तपासणी केली जाणार आहे. तसेच औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. मायानगरी अशी मुंबईची ओळख आहे. इथे प्रत्येक जण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतो, मात्र नोकरीनिमित्ताने होणारी सततची धावपळ, अवेळी खाणे आणि जंकफूडचे अतिसेवन या अशा काही कारणांमुळे मु्ंबईकरांमधील आजाराचे प्रमाण वाढत आहे. जवळपास 34 टक्के मुंबईकरांमध्ये हायपर टेन्शनचे लक्षणं आढळून आले आहेत.
आरोग्य सेविकांना प्रशिक्षण
याबाबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. मुंबईकरांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी महापालिकेच्या वतीने पुढाकार घेण्यात येत असून, त्यांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये जवळपास 34 टक्के मुंबईकरांमध्ये हायपर टेन्शनची लक्षणं आढळून आली आहेत, त्यामुळे आता घरोघरी जाऊन नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत, त्यासाठी अशा वर्कर्स आणि आरोग्य सेविकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी म्हटलं आहे. आरोग्याच्या दृष्टीने दररोज माणसाला 5 ग्रॅम मीठाची आवश्यकता असते, मात्र मुंबईकर दिवसाला सरासरी 9 ते 10 ग्रॅम मिठाचे सेवन करत असल्याची माहिती देखील एका सर्वेक्षणामधून समोर आली आहे.
आरोग्य सेविकांचे मानधन दुप्पट
सध्या आरोग्य सेविकांना दररोज 100 ते 200 रुपये मानधन मिळते. मात्र त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ करून, त्यांच्यामाध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जगजागृती देखील करण्यात येणार आहे.