रेल्वेच्या खडखडाटात या आईचा टाहो नेहमीच कानावर येत राहिल, बाळासाठी तिचा जीव सेकंदासेकंदाला तुटतोय
दिवसाला कोट्यवधी रुपये कमवणारी रेल्वे, या आईच्या ४ महिन्याचा बाळाला परत आणू शकत नाही. तिचा टाहो रेल्वेच्या खडखडाटात नेहमीच जाणवत राहिल, तिचा हा व्हीडिओ सर्वांना कासावीस करणारा आहे, पण प्रवासी जेव्हा रेल्वेचा असतो, तेव्हा त्याच्या संभाव्य अपघाताची, सुरक्षिततेची जबाबदारी त्या प्रशासनाचीच असते.
मुंबई : मुंबई आणि उपनगरांसाठी लोकल ही जीवन वाहिनी झाली आहे. हे जगजाहीर आहे की या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, अनेक वेळा या गाड्या तासंतास बंद पडतात, २० मिनिटाचं अंतरही मग आख्खा दिवस घालवतो. कोट्यवधी रुपयांचा महसूल रेल्वेला यात आहे. सेन्ट्रल रेल्वेचा कारभार आणि व्याप्ती तर खूपच मोठी आहे, येथे कुणाचा आवाज कुणाला येणार नाही. प्रचंड पाऊस झाल्याने हातातून बाळ निसटलं म्हणून कोणत्याही प्रशासनाला वाटणार नाही की ही माझी चूक होती. कबुली द्यायलाही कुणी पुढे येणार नाही. पण अखेर ती होती रेल्वेचीच प्रवाशी.
रेल्वेची यात चूक आहे, असं म्हणणे कुणाला पटणार नाही.खरं आहे कारण पाऊसच तेवढा होता, पूर होता. पण प्रशासन कधी तरी याचा विचार करेल का, लाखो रेल्वे प्रवासी ज्या मार्गाने प्रवास करतात, जेथे कोट्यवधी रुपयांचा महसूल आहे, तो ट्रॅक जास्तच जास्त सुरक्षित करावा. जेव्हा अचानक पावसात रेल्वेगाड्या बंद पडतात. तासनतास ट्रॅकवर उभ्या असतात, तेव्हा रेल्वे प्रवासी हे खाली उतरुन प्रवास करणार हे स्पष्ट आहे. मग अशा वेळेस अनेक ठिकाणी नदी, नाले आणि मोठ मोठ्या गटारी आहेत. यात प्रवासी पडणार नाहीत हे कशावरुन. संकटकाळी रेल्वेला खिडकी दिलेली असतेच ना, मग पावसात रेल्वे बंद पडल्यावर नाले, गटारांवर सुरक्षित चालण्यासाठी योग्य जागा करणे गरजेचे आहेच.
पाऊस वाढल्यावर धोकादायक ठरतील, अशा ठिकाणी सुरक्षित चालण्यासाठी जागा केली पाहिजे, संकटकालीन मार्ग समजून त्यांना सुरक्षित करणे गरजेचे आहे. तसेच केबल पाईपवर अशावेळी कुणी चालताना त्याचा जीव जाण्याची शक्यता असेल, तर त्या दिसणारच नाहीत अशा ठिकाणी टाकल्या पाहिजेत. दिसत असतील तर यावर चालण्यासाठी सुरक्षित केल्या पाहिजेत, गँगमनना देखील याचा उपयोग होवू शकतो. यावर विचार केला गेला पाहिजे.
दिवसाला कोट्यवधी रुपये कमवणारी रेल्वे, या आईच्या ४ महिन्याचा बाळाला परत आणू शकत नाही. तिचा टाहो रेल्वेच्या खडखडाटात नेहमीच जाणवत राहिल, सर्वांचा जीव कासावीस करत राहिलं, रेल्वे यापुढे असं होवू नये म्हणून, काही करेल की हात झटकून मोकळे होतील, कदाचित सोपं ते स्वीकारेल, तरीही कठीण पण सुरक्षित असंच रेल्वे करेल हीच अपेक्षा.
बाळ असं हातातून निसटलं
भिवंडी येथील योगिता रुमाले ( वय 25 ) आपल्या वडीलांसह मुंबईहून भिवंडीकडे निघाली होती, तिच्यासोबत चार महिन्याची मुलगी होती. योगिता ही वडिलांसोबत अंबरनाथ लोकलमधून उतरून पायी कल्याणच्या दिशेने चालली होती. तेव्हा नाला पार करताना मुलगी तिच्या आजोबांकडे होती. त्याच्या हातातून ती हातातून निसटून वाहत्या नाल्यात पडली. हा नाला कल्याणखाडीला जाऊन मिळत असल्याने कल्याण रेल्वे पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी शोधाशोध सुरु केली.