40 डोक्यांच्या रावणानं रामाचं धनुष्यबाण गोठवलं, उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका
ते अपात्र ठरले तर चिन्ह गोठवण्याची जबाबदारी कोण घेईल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंबई : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्ष निवडणूक आयोगानं (Election Commission) गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आज माझ्या कुटुंबीयांशी संवाद साधतोय. मुख्यमंत्रीपद ज्यांना हवं होतं त्यांनी ते घेतलं. सर्व देऊनही नाराज असल्याचं सांगत काही जण निघून गेलेत. मेळावा होऊ नये म्हणून खोकासुरांनी प्रयत्न केलेत. 40 डोक्यांच्या रावणानं रामाचं धनुष्यबाण गोठवलं. पण, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. काही जणांनी आपल्याशी गद्दारी केली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, दोन मेळावे झाले, पण एका ठिकाणी सर्व काही पंचतारांकित होतं. शिवसेना नाव माझ्या आजोबांनी दिलंय. शिवसेनेला पहिलं यश ठाण्यात मिळालं. पण, उलट्या काळजाच्या माणसानं निवडणूक चिन्ह गोठवलं. शिवसेना प्रमुखांनी दिलेली हिंमत तुम्ही गोठवली.
संकट येतात जातात, संकट एक संधी देऊन जातात. मिंधे गटाचा उपयोग भाजप कसा करून घेतोय त्यांना माहीत नाही. निष्ठा विकली जाऊ शकत नाही हे जनतेनं शिवतीर्थावर पाहिलंय, याची आठवण त्यांनी करून दिली.
शिवसैनिकांना आता दमदाट्या सुरू आहेत. शिवसेना संपविण्याचं काम काँग्रेसनही केलं नाही ते तुम्ही करता, अशी टीक शिंदे गटावर केली. बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेसमोर या, असं आव्हान उद्धव ठाकरे याचे शिंदे गटाला दिलं.
ते अपात्र ठरले तर चिन्ह गोठवण्याची जबाबदारी कोण घेईल?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक आयोगाला दिलेली नाव व चिन्हं द्यावं. यासाठी ठाकरेंनी पक्षासाठी तीन नावं दिलीत.ती म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी आहेत. याशिवाय त्रिशूळ, उगवता सूर्य व धगधगती मशाल ही चिन्हं निवडणूक आयोगाकडं सादर केलीत.
आम्हाला तीन नावातलं एक नाव व चिन्हं द्या. आम्हाला जनतेच्या दरबारात जायचं आहे. अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाला केली.