धारावीत उघड्या नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू
उघड्या गटारीत पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकला दिव्यांश (Divyansh Singh) बेपत्ता असताना नुकतंच धारावीतील एका नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : उघड्या गटारीत पडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकला दिव्यांश (Divyansh Singh) बेपत्ता असताना नुकतंच धारावीतील एका नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अमित मुन्नालाल जैसवाल असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे.
धारावीतील उद्यान क्रमांक 1 मधील राजीव गांधी कॉलनीजवळच्या पिवळा बंगला परिसरातील नाल्याजवळ ही घटना घडली. या नाल्यात दुपारी 3 च्या सुमारास अमित नाल्यात पडून बुडू लागला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला नाल्याबाहेर काढत सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गेल्या बुधवारी (10 जुलै) मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळच्या आंबेडकर चौकात आईसोबत दीड वर्षाचा चिमुकला दिव्यांश सिंह दुकानात आला होता. त्यावेळी अचानक खेळता खेळता तो उघड्या गटारीत पडला. या घटनेला पाच दिवस उलटूनही अद्याप तो सापडलेला नाही.
यानंतर शनिवारी (13 जुलै) वरळीतील कोस्टल रोडसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून आणखी एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. बबलू कुमार रामपुनिल पासवान असे या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गटारीत, उघड्या नाल्यात, खड्ड्यात पडल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
संबंधित बातम्या :
गटारीत पडलेल्या दिव्यांशला शोधण्यात अपयश, शोधमोहीम थांबवली!
खुल्या गटारात चिमुरडा पडला, मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह