डोंबिवलीचा तरुण नोकरी सांभाळून जोपासतोय अनोखा छंद, रेल्वे इंजिन ते वंदेभारतपर्यंत मॉडेल्स तयार केली
कोणतीही नविन ट्रेन दाखल होताच सुभाष त्याचे परफेक्ट मिनीएचर मॉडेल्स तयार करतो. त्याने निळी आणि पांढऱ्या वंदेभारतनंतर काल परवाच्या भगव्या ( केशरी ) रंगाच्या वंदेभारतचे मॉडेल लागलीच तयार केले.
मुंबई | 17 जुलै 2023 : कोणाला स्टॅंम्प जमविण्याचा छंद असतो, तर कोणाला विविध प्रकारची नाणी जमविण्याचा छंद असतो, तर कोणी मोठ्या कतृत्ववान व्यक्तींच्या सह्याच जमवित असतो. या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात आपली नोकरी आणि पेशा सांभाळून खरे तर छंद सांभाळणे तसे अवघडच. परंतू काही जण केवळ स्वत:ला मिळणारे समाधानासाठी अफलातून छंद जोपासतात. असाच एका डोंबिवलीचा एक हरहु्न्नरी तरुण रेल्वे इंजिन आणि मेल-एक्सप्रेसची विविध मॉडेल्स घरात तयार करण्याचा छंद गेली अनेक वर्षे जोपासत आहे.
डोंबिवलीचा सुभाष राव याला लहानपणापासून रेल्वे प्रवासाची आवड होती. तो रहात असलेल्या डोंबिवलीत त्याने बालपणापासून रेल्वेला जवळून पाहीले आहे. एल. के. रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण झाल्यावर एका प्रसिद्ध एडर्व्हाटायझिंग कंपनीत तो कामाला आहे. परंतू त्याच्या रेल्वेची विविध इंजिन आणि स्केल मॉडेल्स तयार करण्याच्या छंदाला त्याने जोपासत त्याने त्यात अनेक प्रकारचे प्रयोग करीत वैविध्य आणले आहे. सुभाषने रेल्वे इंजिन आणि कोचचे फोटो काढून त्याआधारे एल्युमिनियम धातूपासून रेल्वेची मॉडेल्स तयार करायला सुरुवात केली. नंतर त्याने त्या अधिक परफेक्शन आणत आज त्याचा प्रवास स्केल मॉडेल्सपर्यंत आणला आहे. त्याची वर्कींग ट्रेन मॉडेल्स तोंडात बोट घालायला लावतील इतकी ती हुबेहुब आहेत. आता तर त्याने पेपर मॉडेल्सवर हुकुमत मिळविली आहे. रेल्वेकडूनही त्याचे कौतूक झाले आहे.
कोणतीही नविन ट्रेन दाखल होताच सुभाष राव त्याचे परफेक्ट मिनीएचर मॉडेल्स तयार करतो. त्याने रेल्वेच्या डब्यांना विविध प्रकारच्या रंगसंगती देखील रेल्वे मंत्रालयाला सुचविल्या आहेत. त्याने निळी आणि पांढऱ्या वंदेभारतचे पेपर मॉडेल्स तयार केले होते, काल परवा दाखल झालेल्या भगव्या ( केशरी ) रंगाच्या वंदेभारतचे मॉडेल लागलीच त्याने तयार केले.
हा पाहा सुभाष राव याचा व्हिडीओ..
View this post on Instagram
सुभाष याने वंदेभारत एक्सप्रेसचे स्केल स्टॅटीक मॉडेल तयार केले आहे. वंदेभारतचे नवीन भगवे मॉडेल पेपर मॉडेलसाठी त्याने फोटोग्राफीक पेपरचा वापर करीत एच. ओ. स्केल (1:87 ) मॉडेल तयार केले आहे. तो कोणतंही मॉडेल तयार करण्यासाठी त्या ट्रेनचे फोटोग्राफ्स, ब्ल्युप्रिंट आणि तांत्रिक माहीती याचा आधार घेतो असे त्यानी म्हटले आहे. त्याने यापूर्वी रनिंग मॉडेल्ससाठी प्लास्टीक, कागद, टुथपिक, नेटवर्कींग केबल अशा वस्तूंचा खुबीने वापर केला आहे. लोकलचा हॉर्न तयार करण्यासाठी त्याने बॉलपेनची निप वापरल्याचे पाहून तुम्ही आश्चर्यचकीत होऊन तोंडात बोट घालाल इतकी ती हुबेहुब लोकलच्या बिगुल सारख्या दिसणाऱ्या हॉर्नच्या जागी फिट झाली आहे. प्रत्येक ट्रेनचे मॉडेल साकार झाल्यावर त्याचे मिनिएचर रुप पाहून त्यातून मिळणार समाधान कशातच नाही असे सुभाष राव सांगतो.