Mumbai Leopard : मुंबईतील मनपा शाळेत मध्यरात्री घुसला बिबट्या, सुरक्षा रक्षकानं शौचालयात डांबून ठेवलं, बिबट्या वनविभागाच्या ताब्यात
भटक्या कुत्र्यांपासून बचावासाठी हा बिबट्या शाळेतील शौचालयात शिरला असावा. सुरक्षा रक्षकाकडून माहिती मिळाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता वनविभागाचे अधिकारी पोहचले. तोपर्यंत बिबट्या शौचालयातच होता. त्याला सुरक्षा रक्षकानं डांबून ठेवलं.
मुंबई : मुंबईतील शाळेत बिबट्या घुसला. त्याला शौचालयात पकडण्यात आळं. ही घटना महापालिकेच्या शाळेत बुधवारी सकाळी घडली. ही शाळा गोरेगाव पूर्वच्या बिंबीसार नगरात आहे. हा बिबट्या तीन ते चार वर्षांचा आहे. सकाळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला बिबट्या मध्यरात्री दिसला. बिबट्या शौचालयात घुसला. सुरक्षा रक्षकानं शौचालयाचा दरवाजा लावला. त्यानंतर वनविभागाला (Forest Department) कळविलं. बिबट्या मनपा शाळेतील शौचालयात असल्याची माहिती लोकांना मिळाली. त्यानंतर लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. पोलिसांनी (Police) गर्दीवर नियंत्रण मिळविलं, अशी माहिती ठाण्यातील वनविभागाचे अधिकारी (Forest Department Officers) रोहित मोहिते यांनी दिली.
तपासणीनंतर बिबट्याला सोडले जाणार
भटक्या कुत्र्यांपासून बचावासाठी हा बिबट्या शाळेतील शौचालयात शिरला असावा. सुरक्षा रक्षकाकडून माहिती मिळाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता वनविभागाचे अधिकारी पोहचले. तोपर्यंत बिबट्या शौचालयातच होता. त्याला सुरक्षा रक्षकानं डांबून ठेवलं. बिबट्याला पकडल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याला ठेवण्यात आल्याचं पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितलं. बिबट्याचं परीक्षण केल्यानंतर त्याला सोडलं जाणार आहे. वनविभागाचे अधिकारी आले. कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं जाळी टाकून बिबट्याला जाळ्यात पकडले. त्यानंतर वन्यजीव रिस्क्यू टीमनं त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात येतील. प्रकृती चांगली असल्यास त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
सुरक्षा रक्षकानं डांबून ठेवलं
जंगलात पाणी न मिळाल्यानं तो पाण्याच्या शोधात आला असावा, असं मोहिते यांचं म्हणण आहे. या बिबट्यासारखाच एक बिबट्या 2020 मध्ये ठाण्यातील येऊर जंगलात सोडण्यात आल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. शाळा नुकत्याच सुरू झाल्या. अशात हा बिबट्या शाळेत घुसला. पण, कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सुरक्षा रक्षकाच्या समयसुचकतेमुळं त्यानं बिबट्याला आतमध्ये डांबून ठेवलं. त्यामुळं बिबट्या सहज वनविभागाच्या तावडीत सापडला. यापूर्वीसुद्धा हा बिबट्या या भागात दिसला. पण, या बिबट्यानं कोणतही नुकसान केलेलं नाही. या भागात याचा वावर आहे. शांत ठिकाण असल्यानं इथं आला असावा, अस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.