Maharashtra Din 2023 : मुंबईतील असे ठिकाण ज्याला भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांचा झाला होता पदस्पर्श, काय आहे कथा ?
इंग्रजांनी मुंबईत आपल्या विदेशी शासनाची पाळेमुळे रोवली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या 'बॉम्बे कॅसल'पासून त्यांनी त्यांची राजवट सुरू केली. स्थलांतरणाच्या ओघात त्यांनी गव्हर्नमेंट हाऊस 'मलबार पाँईट' येथे हलविले.
मुंबई : मुंबईच्या नैऋत्य दिशेला भव्य असा डोंगर आहे. हा डोंगर म्हणजेच वाळकेश्वर. याला ‘मलबार पॉईंट’ असेही म्हणत. ( आताचे मलबार हिल ) या डोंगरावर अनेक मंदिरे होती. त्यातील प्रमुख देवालय म्हणजे वाळकेश्वरचे देवालय. उत्तम खोदीव काम केलेले दगड, खांब, पुतळे असे हे मंदिर दहाव्या शतकांतील असल्याचे बोलले जाते. पूर्वी हा डोंगर मुख्य शहरापासून वेगळा होता. त्यावर गुरांना चरण्यासाठी नेत असत. ही जागा इतकी रानवट होती की दिवसाही येथे जाण्यास लोक धजावत नसत. पूर्वीच्या काळी भिकारी किंवा कंगाल लोकांचा हा डोंगर आधारस्तंभ होता.
मुंबईमध्ये इंग्रजांच्या नजरेत ही जागा भरली. वाळकेश्वर येथील हवा मुंबईतील अन्य ठिकाणापेक्षा मोठी आरोग्यकारक आहे असे ते म्हणू लागले. हळूहळू त्यांनी हा डोंगर साफ केला. भिकारी, कंगाल लोक यांना तेथून हुसकावून लावले. हवेशीर बंगले बांधले. बाग, बगीचे तयार केले गेले आणि त्यानंतर हा डोंगर जणू काही श्रीमंत आणि साहेब लोकांना आंदण दिल्यासारखा झाला. मुंबईचे गव्हर्नर यांच्यासाठी अतिभव्य असा बंगला समुद्र किनारी बांधण्यात आला.
इंग्रजांनी मुंबईत आपल्या विदेशी शासनाची पाळेमुळे रोवली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘बॉम्बे कॅसल’पासून त्यांनी त्यांची राजवट सुरू केली. स्थलांतरणाच्या ओघात त्यांनी गव्हर्नमेंट हाऊस ‘मलबार पाँईट’ येथे हलविले. 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री भारत स्वतंत्र राष्ट्राची विजयी घोषणा झाली आणि नवीन भारतामध्ये गव्हर्नमेंट हाऊसला `राजभवन` असे नवे नाव दिले गेले. त्यापाठोपाठ इंग्रज साहेबांचे असलेले महत्वाचे बंगले मुख्यमंत्री, मंत्री आणि अतिमहत्वाच्या व्यक्ती यांना देण्यात आले. इंग्रजांनी बांधलेल्या उत्तम वास्तुरचनेचे नमुने असे हे बंगले आहेत.
काय आहे वाळकेश्वर मंदिराचा इतिहास ?
जुन्या काळात वाळकेश्वर याला वालुकेश्वर म्हणत. वालुकेश्वर म्हणजे वाळूने केलेला ईश्वर. वालुकेश्वर महात्म्य यात अशी कथा आहे की, राम व लक्ष्मण अयोध्येहून लंकेस जाण्याकरिता निघाले असता समुद्रकाठी असलेल्या या डोंगरावर आले. श्री राम यांचा असा नियम होता की दररोज लक्ष्मणाकडून काशीतून एक शिव लिंग आणून त्याची पूजा करावी.
पण, त्या दिवशी लक्ष्मणास काशीतून शिव लिंग आणण्यास उशीर झाला. त्यामुळे श्री राम यांनी समुद्र काठावरील वाळूचे शिव लिंग बनविले आणि ते पूजन करून त्याची तेथेच स्थापना केली. इतक्यात लक्ष्मणही तेथे आला. तेव्हा त्यानें आणलेले शिव लिंगही काही अंतरावर तेथेच स्थापन केले. त्यामुळे ज्यास वालुकेश्वर म्हणतात तो वस्तुतः लक्ष्मणेश्वर आहे.
मात्र, रामाने स्थापलेले लिंग कोठे आता आढळत नाही. याबद्दल असे सांगण्यात येते की, यवन लोकांच्या राज्यास कंटाळून ते गुप्त झाले आणि काही जण म्हणतात की इंग्रजांनी ते फोडून टाकले. अर्थात याचा पुरावा उपलब्ध नाही.
संबंधित बातम्या :
हे ही वाचा : MUMBAI HISTORY 1 : मुंबईत असेही होते काही धडधडणारे कारखाने, ज्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेच नसेल
आणखी एक कथा
वाळकेश्वरचे हे देवालय फार जुने आहे. याविषयी अशी माहिती मिळते की, सुमारे 600 वर्षांपूर्वी भीमराजाच्या सरदारांपैकी केवाजी राणा हा मराठा सरदार इथे होता. त्याने हे देवालय बांधले. इंग्रज येण्यापूर्वी ह्या देवळाचा फक्त पाया दिसत होता. त्यानंतर देवळाभोवती बुरूज बांधला. याच मुख्य देवालयाच्या बाजूला दुसरीही मंदिरे आहेत. बाजूला बऱ्याच धर्मशाळा आणि मध्ये एक मोठे तळे आहे.
वालुकेश्वर देवालयाची व्यवस्था
इ.स. 1724 मध्ये रामाजी कामत या सारस्वत ब्राह्मणाने वालुकेश्वर मंदिराची डागडुजी केली. ही देवालयाची जागा त्याला सरकारने मोफत दिली होती. रामजी कामत हे प्रख्यात आणि वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जात.
हे ही वाचा : MUMBAI HISTORY 2 : हे माहित आहे का ? पहिले पांजरापोळ कुणी बांधले ? गुरे पाळण्यासाठीही द्यावा लागत होता इतका कर
बाणगंगेचा उदय कसा झाला ?
वालुकेश्वर मंदिराला लागूनच एक मोठे तळे आहे. हेच प्रसिद्ध बाणगंगा तळे. बाणगंगेविषयी अशी कथा आहे की, वालुकेश्वर येथे शिव लिंगाची स्थापना केल्यावर श्री रामचंद्रास तहान लागली. पण, पाणी कोठे मिळेना म्हणून त्याने एक बाण मारून त्या ठिकाणी पाणी काढले. बाण मारून पाणी काढले आणि त्यातून तळे निर्माण झाले म्हणून ही बाणगंगा. बाणगंगा, बाणतीर्थ आणि पाताळगंगा अशी पुढे नावे पडली. श्री रामाने पाताळांतून बाणाने भोगावती वर आणली म्हणून ती पाताळगंगा
इ.स. 1825 च्या सुमारास आणि त्याहीपूर्वी या तळ्याकाठी मोठमोठी झाडे होती. या ठिकाणी बहुतेक ब्राह्मण लोकांची वस्ती असे. हे स्थान एक तपोवनच बनले होते. पण, हळू हळू वस्ती वाढली आणि सर्व नवीन व्यवस्था झाली. मुंबईतील महाजन लोकांनी पुढे वर्गणी गोळा करून हे तळे नीट केले. काही वर्षांपूर्वी तळे उपसून त्यातील चिखल वगैरे काढून स्वच्छ केले. अनेक उद्योगपती, मोठ मोठे वाणी वगैरे येथे जाऊन नेहमी दान धर्म करत. त्यापैकी अनेकांनी येथे अन्न छत्रें सुरु केली होती.
वाळकेश्वर मंदिर आणि बाणगंगा परिसरात अनेक मंदिरे असून प्रमुख मंदिर भगवान शंकराचे आहे. तर, दुसरे श्री गणपतीचे आहे. ही सर्व मंदिरे बाणगंगेच्या कांठावर आहेत. येथे वर्षांतून दोनदा जत्रा भरते. जत्रेच्या दिवशी शिव लिंगावर शंकराचा मुकुट बसवून उत्तम कपडे घालून ते सुशोभित करितात. नेहमीपेक्षा सोमवार, शिवरात्र आणि जत्रा इत्यादि प्रसंगी वाळकेश्वरला अनेक लोक दर्शनासाठी जातात.