कळवानजीक लोकलमधून पडून पोलीस सब इन्सपेक्टरचा मृत्यू
मुंबई उपनगरीय लोकलमधून पडून दररोज सरासरी दहा प्रवाशांचा दररोज मृत्यू होत असतो. दरवर्षी लोकल अपघातात तीन ते साडेतीन हजार जणांचा मृत्यू होतो तर तेवढ्याच संख्येने प्रवासी जखमी होत असतात. रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू होत असतात, त्यानंतर लोकल पकडताना पडल्याने तसेच गर्दीमुळे दारातून पडल्याने प्रवाशांचे मृत्यू होतात.
मुंबई : पवई पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कळवा स्थानकाच्याजवळ लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक मनोज गजानन भोसले ( वय 57 वर्ष ) , रा.ठी. पारसिक नगर, कळवा हे दिवसपाळीकरून शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घरी जात असताना त्यांचा कळवा स्थानक येण्यापूर्वी तोल जाऊन ते पडले.
त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ठाण्यातील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासून त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यांच्या पाकीटातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई उपनगरीय लोकलमधून पडून दररोज सरासरी दहा प्रवाशांचा दररोज मृत्यू होत असतो. दारात लोंबकळत प्रवास करणे धोकादायक असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद दरवाज्याच्या लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. या बंद दरवाजाच्या एसी लोकलची संख्या अत्यंत कमी असून त्यांचे तिकीट दरही जास्त असल्याने त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.
जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या आठ महिन्यात मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिनही मार्गावर मिळून धावत्या लोकलमधून पडून तब्बल ४१५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे. याच काळात तिनही मार्गावर मिळून एकूण १६०५ जणांचा विविध कारणांनी मृत्यु झाला आहे.