देवाने तान्हुल्या बाळांना दिलेला अधिकार, तिने एका झटक्यात हिरावून घेतला, चिकटपट्टीने काही दिवसांच्या बाळांवर अत्याचार
प्रत्येक लहान बाळाला काय हवंय काय नकोय, यासाठी त्याला काही जन्म झाल्यापासून लगेच बोलता येत नाही, त्याला जे काही सांगायचं असतं ती भाषा एकच असते, ते म्हणजे रडणं. लहान बाळ आपल्या आईला काय हवं नको ते रडूनच सांगत असतं. रडणे ही लहान मुलांची भाषा असते, ती सर्वात जास्त त्याच्या आईला समजते. मात्र एक असा प्रकार घडला आहे, जो अतिशय घृणास्पद आणि निर्दयी आहे.
मुंबई : भांडूप पश्चिम येथील एलबीएस, मारुती मंदिर रोड येथील प्रसूतिगृहात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात कार्यरत असणाऱ्या परिचारिकांकडून लहान मुलांचा आणि त्यांच्या मातांचा छळ होत असल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबई महापालिकेने हे प्रसूतिगृह खासगी व्यक्तीला चालविण्यास दिले आहे. भाजपच्या माजी नगरसेविका जागृती पाटील यांनी प्रसूतिगृहातील धक्कादायक स्थिती पाहून रुग्णालय प्रशासनाविरोधात एस वॉर्डच्या सहायक आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
भांडुप येथे रहाणाऱ्या प्रिया कांबळे यांना प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या प्रसुत झाल्या. परंतु, बाळाला कावीळ झाल्यामुळे त्याला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रात्रीच्यावेळी प्रिया आपल्या बाळास पहाण्यासाठी एनआयसीयूमध्ये गेल्या तेव्हा त्यांना धक्का बसला.
एनआयसीयूमधील परिचारकांनी बाळाच्या तोंडात चोखणी दिली होती. परंतु, रात्रीच्यावेळी बाळ रडले तर त्याचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून त्या परिचारकांनी बाळाच्या तोंडाला चक्क चिकटपट्टी लावल्याचे त्यांना आढळून आले.
प्रिया यांनी हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांच्या कानावर घातला. नातेवाईकांनी ही घटना माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्या कानावर घातली. घटनेचे गांभीर्य ओळखून जागृती पाटील यांनी तात्काळ रुग्णालय गाठले. पाटील यांच्या सहकार्याने प्रिया आणि त्यांच्या नातेवाईकांनी तेथून तत्काळ डिस्चार्ज घेतला आणि ठाणे येथील रुग्णालयात दाखल केले.
संदर्भात माहिती देताना नगरसेवक पाटील यांनी सांगितले, सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात नवजात बालकांचा अमानुष छळ करण्यात येतो. येथील परिचारिका कामाचा प्रचंड कंटाळा करतात. या परिचारिका बाळांना वेळेत आणि नीट दूध पाजत नाहीत. आईचे दूध वाटीत घेऊन बालकांना पाजतानाही त्या निष्काळजीपणा करतात.
त्यांच्या रडण्याचा त्रास होऊ नये म्हणून चिकटपट्टी लावतात. शी, शू केलेल्या बाळांचे डायपर बदलले जात नाही. बाळंतपणासाठी आलेल्या महिलांनाही चांगली वागणूक दिली जात नाही असे आरोप जागृती पाटील यांनी केले. तसेच, या प्रकारासंदर्भात एस वॉर्डच्या सहायक आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.