
मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : मुंबईकरांचा रोजचा धकाधकीचा लोकल प्रवास अधिकच खडतर झाला आहे. ट्रेनमध्ये बसायला मिळत नाही म्हणून कारशेडमधून बसून आलेल्या एका महिलेला इतर महिलांच्या गटाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमात पोस्ट करणाऱ्याने टाकलेल्या माहितीनूसार शुक्रवारी 8.10 वाजता लोकलमध्ये अंबरनाथ शेडमधून बसून आलेल्या महिलांना इतर महिलांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ दिसत आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोरच या महिलांना मारहाण होत आहे.
मुंबई लोकल प्रवासात ठाण्यापलिकडे प्रवास जीवघेण्या गर्दीचा असल्याने लोकल ट्रेनमध्ये काही स्थानकात प्रवासी बसायला जागा मिळावी म्हणून दुसऱ्या स्थानकातून बसून येतात किंवा कारशेडमधून बसून येतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत बसण्याच्या जागेवरुन प्रवाशांमध्ये खटके उडत असतात. महिलांच्या डब्यात एका महिलेला इतर महिलांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर एका महिलेने आपल्या मोबाईलवरुन चित्रीत करून व्हायरल केला आहे. या व्हिडीओत दोन महिलांना इतर महिला मारहाण करीत असताना दिसत आहेत. जीआरपी पोलिसांनी हस्तक्षेप करून या महिलांना मारहाण सुरुच असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या दोन महिलांना ठाणे स्थानकात लोकलच्या डब्यातून पोलिस बाहेर काढताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रवासी महिला संघटना सक्रीय झाल्या आहेत. या व्हिडीओतील महिलांचा शोध घेऊन ग्रुपने प्रवास करणाऱ्या या महिलांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. कल्याण , डोंबिवली, ठाणे आरपीएफ आणि रेल्वे जीआरपीकडे या व्हिडिओचा शोध घेऊन मारहाण करणाऱ्या महिलांवर कारवाईची करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे आरपीएफ अधिकारी आणि जीआरपी अधिकारी या व्हिडिओचा तपास लावत असून नेमका हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे याबाबत माहिती घेत आहेत.