धोकादायक इमरातींना नोटीस न दिल्यास वार्ड ऑफिसरवर कारवाई; आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई : सध्या मुंबईमध्ये (Mumbai) धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात अशा इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे असे प्रसंग टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेवावा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपत्तींमध्ये मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. तसेच ज्या धोकादायक इमराती आहेत त्यांना नोटीस देऊन तेथील रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात यावी असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. धोकादायक इमरातींची माहिती न दिल्यास तसेच त्या इमारतीमुळे काही दुर्घटना घडल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी ही वार्ड ऑफिसरची असेल. त्यावर काडक कारवाई करण्यात येईल असे देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयातील समिती सभागृहात राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत.
विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिकांचे प्रमुख अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्यासह प्रमुख खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या भागात पावसाळ्यात वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्या भागात विशेष लक्ष देण्याचे तसेच उपाययोजना करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. दरड कोसळू नये यासाठी आधीच काळजी घेण्यात यावी अशा सूचना देखील या आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत.



दक्षता घेणे आवश्यक
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. पावसाळ्यात इमारती, तसेच दरडी कोसळून अनेक दुर्घटना घडतात. या घटनांमध्ये अनेकांचा बळी जातो. मात्र वेळीच अशा घटनांकडे लक्ष दिले तर आपण या घटना टाळू शकतो. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना सूचना देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.