खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेचा अॅक्शन प्लॅन, पालकमंत्री लोढा यांचे आयुक्तांना आदेश काय?
मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत यासाठी पालकमंत्री लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मुंबई । 1 ऑगस्ट 2023 : पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली असतानाच आता मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही पुढाकार घेतला आहे. मुंबईमध्ये गेले १० दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे विविध रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम परवा रात्रीपासून सुरु झाले असून याची पाहणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल रात्री केली. त्यानंतर आज त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत. हे खड्डे भरण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत यासाठी पालकमंत्री लोढा यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी मास्टिक तंत्रज्ञानाने खड्डे भरण्यासाठी तातडीने हॉट मास्टिंग मशीन उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, प्रत्येक विभागासाठी खड्डे बुजविण्यासाठी एक नोडल इंजिनियर नियुक्त करावा. सध्या खड्डे बुजविण्याच्या सुरु झालेल्या कामाचा वेग वाढवावा आणि या आठवड्या अखेरपर्यंत मुंबईतील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत असे आदेश पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशानुसार आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांची तपशीलवार बैठक घेऊन खड्डे बुजवावेत यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला. भविष्यात निर्माण होणाऱ्या खड्ड्यांबाबत नागरिकांसाठी एक व्हाट्सअॅप तक्रार क्रमांक आणि अॅपद्वारे तक्रार प्राप्त झाल्यावर २४ तासात खड्डे बुजविले जावेत असेही आदेश दिलेत. प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून मुंबईतील खड्डे एका आठवड्यात बुजविले जातील असा विश्वास पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.