मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंगने देशातील सद्य परिस्थितीवर बोलताना चिंता व्यक्त केली आहे (Sushant Singh on CAA and Inquilab). तसेच आपण भगतसिंग चित्रपटात क्रांतीकारी सुखदेवची भूमिका साकाताना तो चित्रपट ज्या क्रांतीवर (इन्कलाब) अवलंबून आहे ती या डोळ्यांनी इथं पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं, असं मत व्यक्त केलं आहे. तो मुंबईत आझाद मैदानावरील नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ आंदोलनात बोलत होता.
सुशांत सिंग याने यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. तसेच गृहमंत्र्यांना जळणाऱ्या बसची काळजी आहे, मात्र मरणाऱ्या माणसांची काळजी नसल्याचा आरोप केला. सुशांत सिंग म्हणाला, “भगतसिंग सिनेमाचं शूट करत असताना ‘इन्कलाब’ डोळ्यांनी बघेल, असं वाटलं नव्हतं. गृहमंत्री म्हणतात बस जाळू नका. यांना बसची पडली आहे. बस खुप कमी आहेत जाळू नका. मग काय माणसं जास्त आहेत म्हणून त्यांना मारायचं का? या नरभक्षकांपासून हा देश वाचवायचा आहे. मी शेवटपर्यंत लढेल. माझी पंतप्रधानांना यात लक्ष घालण्याची विनंती आहे.”
सुशांत सिंगने भगतसिंग चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे सहकारी सुखदेवची भूमिका साकारली होती. हा चित्रपट तरुणाईच्या चांगलाच पसंतीस पडला होता. याचाच संदर्भ घेत सुशांत सिंगने देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. मोदी-शाह बहुमत मिळाल्याचा गैरफायदा उचलत आहेत. त्यांनी नसते उद्योग करण्यापेक्षा मुलभूत प्रश्न सोडवावेत. हा कायदा त्यांना मागे घ्यावाच लागेल, असा आक्रमक पवित्रा आंदोलन कर्त्यांनी घेतला. आंदोलनकर्त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल ठाकरे सरकारचे आभारही मानले.
सुशांत सिंग बॉलिवूडमधील त्या मोजक्या अभिनेत्यांपैकी आहे ज्यांनी खुलेपणाने सीएए कायद्याविरोधात भूमिका घेतली. त्याच्या या भूमिकेनंतर तो करत असलेल्या सावधान इंडिया या मालिकेतील त्यांचं कामही बंद करण्यात आलं, असंही बोललं जात आहे.
Sushant Singh on CAA and Inquilab