मुंबई : मुंबईतील ‘आरे कारशेड’चा वाद विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर चांगलाच रंगला आहे. त्यातच मुंबई मेट्रोच्या बांधकामादरम्यान हलगर्जी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण जुहूमध्ये मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटमधून दगड अभिनेत्री मौनी रॉयच्या कारवर (Actress Mouni Roy Saved) कोसळला. या अपघातातून ती बालंबाल बचावली आहे.
मौनी रॉय ‘मेड इन चायना’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यासाठी बुधवारी सकाळी आपल्या कारने निघाली होती. जुहू भागात मुंबई मेट्रोचं काम सुरु असलेल्या भागाखाली तिची गाडी उभी होती. यावेळी एक दगड वरुन आपल्या कारवर कोसळल्याचा दावा मौनीने केला आहे.
मौनीने या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन मुंबई मेट्रो प्राधिकरणावर (Actress Mouni Roy Saved ) संताप व्यक्त केला आहे. ‘मी कामासाठी निघाले असताना जुहू सिग्नलजवळ अकरा मजली उंचावरुन मोठा दगड माझ्या कारवर कोसळला. काहीच करु शकत नाही, पण विचार करा माझ्याजागी कोणी पादचारी असता तर काय झालं असतं? मुंबई मेट्रोच्या बेजबाबदारपणाविषयी काय करावं, काही सुचवाल का?’ असा प्रश्न मौनीने ट्विटरवरुन विचारला आहे.
Was on my way to work at Juhu signal a huge rock falls on the car 11 floors up. cant help but think what if anybody was crossing the road. Any suggestions as to what to be done with such irresponsibility of the mumbai metro ? pic.twitter.com/UsKF022lpl
— Mouni Roy (@Roymouni) September 18, 2019
मौनी रॉयच्या कारच्या पुढील काचेवर (सनरुफ) दगडामुळे मोठं भगदाड पडलेलं दिसत आहे. मुंबई मेट्रोच्या बिल्डिंगमधून कुठून दगड पडला असावा, हे दाखवण्यासाठी तिने इमारतीच्या वरपर्यंत कॅमेरा दाखवला आहे.
मौनीच्या ट्वीटवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. हा दगड जीवघेणा ठरु शकला असता, असं सांगताना पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला तिला देण्यात आला आहे.
33 वर्षीय मौनी रॉय मेड इन चायना, ब्रम्हास्त्र, मोगल या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. याआधी ती गोल्ड, रोमिओ अकबर वॉल्टर यासारख्या चित्रपटात झळकली आहे. क्योंकि सास भी कभी बहू थी, कस्तुरी, देवों के देव महादेव, झलक दिखला जा 7, नागिन यासारख्या टीव्ही शोमध्ये मौनीने भूमिका साकारल्या आहेत.