मुंबई : मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राजच्याप्रमाणे आजही राजकीय मुद्द्यांना बगल देत काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. अनेकदा लहान मुलांची रस्ता ओलांडताना अडचण होते. त्यातून अनेकदा अपघातही झाले आहेत. मात्र आता शाळेभोवतीचा (School) 500 मीटरचा परिसर विद्यार्थ्यांकरता सुरक्षित होणार असल्याची माहिती दिली आहे. शाळेभोवतीचा रस्ता वाहतूकीच्या दृष्टीनं सुरक्षित करण्याचा प्लॅन शासनाकडून आखण्यात आला आहे. त्यासाठी शाळेभोवती स्पिडब्रेकर्स (Speed breaker) आवश्यक असल्याचे मत मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. सोबतच, विद्यार्थ्यांचे दंत आरोग्य, मधुमेह आणि मानसिक आरोग्यावरही काम होणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांभोवतीच्या धोक्याला स्पीडब्रेकर लागण्यास सहाजिकच मदत होणार आहे. येत्या काही दिवसात या नव्या प्लॅनची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे.
तसेच आदित्य ठाकरे यांना राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी त्यावर भाष्य करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या घडीला आम्ही सगळे राजकीय पक्ष इतिहासात काय घडलं? 20, 25 वर्षांपूर्वी काय झालं यावर भांडतोय. सगळी मिडीया स्पेस आम्हीच व्यापून टाकलीय. भविष्यात काय करायचंय यावर बोलतच नाहीये, अशी खंतही आदित्या ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे हेही होते. त्यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाबाबत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेबाबत भाष्य केले आहे. शिवसेनेला इतरांसारखी गर्दी दाखवण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी मनसेला लगावला आहे. तर मुख्यमंत्र्यांची सभा विराटच होईल. महाराष्ट्रात महानिकास आघाडीनं कोरोना काळात जे काम केलंय ते सर्वाना माहितीय.
एकनाथ शिंदे यांच्यानंतर पुन्हा आदित्य ठाकरेंनी राजकीय मुद्दे टेकओव्हर करत आपण निवडणुकीसाठी कधीही तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच आज सुरक्षित शाळांबाबत आम्ही नवे उपक्रम हातात घेतोय. महाराष्ट्र कोरोना काळात इतर राज्याच्याही संपर्कात होता. कोरोनाकाळात शिवसेनेने चांगले काम केलं आहे. त्यामुळे आगामी काळात केव्हाही निवडणुका झाल्या तरी आम्ही तयार आहोत अशी प्रतिक्रिया यावर त्यांनी दिली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसात अनेक घमासान राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यात मनसेने पुन्हा शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आव्हान दिलं आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी निवडणुका या चुरशीच्या होणार आहेत.