आदित्य ठाकरे यांनी लिहिले आयुक्तांना पत्र, ‘त्या’ घोटाळ्याचे काय झाले? केला प्रश्नांचा भडीमार
सध्याच्या बेकायदेशीर राजवटीत जे दरोरोज राजरोसपणे घोटाळे सुरु आहेत त्या संबंधित सर्व घोटाळ्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. शहराच्या हितासाठी तुम्ही करार रद्द कराल. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चौकशी अहवालाची प्रत शेअर कराल.
मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहिले आहे. आम्ही रस्त्यावरील फर्निचरचा घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये बेकायदेशीर आणि अनैतिक मुख्यमंत्र्यांनी BMC च्या कथित २६३ कोटी रुपयांच्या स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणाही केली. BMC ने चौकशी करण्यासाठी सह महापालिका आयुक्त (दक्षता) यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. (कमालीची गोष्ट अशी की त्या अधिकाऱ्याची आता BMC मधून बदली झाली आहे.) या चौकशीचे पुढे काय झाले असा सवाल आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मी विविध माध्यमांतून आणि माझ्या पत्रांतून तुमच्या नजरेत BMC मधील २६३ कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. माझ्या मागील पत्रात रस्त्यावरील फर्निचर घोटाळा आणि त्यामुळे आपल्या मुंबई शहरात निर्माण होत असलेल्या गोंधळाबाबत अधिक स्पष्टता मिळविण्यासाठी महत्वाचे मूलभूत प्रश्न विचारले होते. मुंबईकरांच्या कष्टाने कमावलेल्या पैश्यांचा गैरवापर करून BMC वर नियंत्रण असलेले सरकारमधले लोक कंत्राटदार मित्रांचा कसा फायदा करून देत आहेत हेही समोर आणले होते, असे आदित्य ठकारे यांनी पत्राच्या सुरवातीला म्हटले आहे.
चौकशी हा व्यवहार्य पर्याय नाही
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने हा मुद्दा तात्पुरता उचलून धरला. विधानसभेत ह्या विषयाचे श्रेय घेण्यासाठी सांगितले की, सरकारने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. कदाचित घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसाठी हा कंत्राटदार खास महत्वाचा आहे. त्यामुळेच त्याची आणि चौकशीच्या काळातही कंत्राटदाराला मदत करण्याची गरज त्यांना वाटत आहे. त्यामुळे चौकशी हा व्यवहार्य पर्याय नाही असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
चौकशीची स्थिती काय आहे?
आता तीन महिन्यांनंतर मला सांगण्यात आले की चौकशी सोडून देण्यात आली आहे. काम थांबवा आणि पेमेंट थांबवण्याचे आदेश असूनही १३ शेड्यूल केलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू BMC खरेदी करत आहेत. सरकारकडून चाललेली ही मुंबईची निर्लज्ज लूट आहे. २६३ कोटी रुपयांच्या वस्तू खरेदी करायच्या होत्या त्यापैकी बीएमसीने आता रखडलेल्या कराराचा भाग म्हणून सुमारे २२ कोटी रुपयांचे स्ट्रीट फर्निचर आधीच खरेदी केले आहे. हे लक्षात घेता मला जाणून घ्यायचे आहे की चौकशीची स्थिती काय आहे? चौकशी जर पूर्ण झाली असेल तर मला चौकशी अहवालाची प्रत आणि BMC ने ह्या संदर्भात केलेल्या कारवाईचा तपशील द्यावा अशी विनंती ठाकरे यांनी केली आहे.
लेखी आदेश सुपूर्त करावा.
बीएमसीने करार रद्द केला आहे का? होय असल्यास करार रद्द करण्याचा लेखी आदेश सुपूर्त करावा. कारण, विधानसभेतच सत्ताधारी पक्षातील सदस्याने तशी घोषणा केली होती. ह्या प्रकल्पाचे प्रभारी असलेल्या उपमहापालिका आयुक्तांची BMC ने काही विभागीय चौकशी सुरू केली आहे का? यादीतील नॉन-शेड्यूल वस्तूंसाठी किंमत ठरवणाऱ्या नगररचनाकारांविरुद्ध BMC ने चौकशी सुरू केली आहे का? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना विचारले आहेत.
नियम आणि सार्वजनिक खरेदीचे नियम डावलले
मी तुमच्याकडून अधिकृतपणे ह्या चौकशीची स्थिती जाणून घेण्यास उत्सुक आहे. जर कोणतीही चौकशी सुरू झाली नसेल तर त्याची कारणे काय आहेत हे ही जाणून घ्यायचे आहे. घोषणेनंतर तीन महिने उलटूनही चौकशी रखडली आहे. अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. ह्यावरून पारदर्शकतेकडे दुर्लक्ष होत असून नियम आणि सार्वजनिक खरेदीचे नियम डावलले आहेत हे असे दिसते आहे असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.