विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा, पावसामुळे अकरावी प्रवेशांसाठी मुदतवाढ
शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच थेट परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवली.
मुंबई : शहर आणि उपनगरासह ठाणे परिसरात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याच थेट परिणाम अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवरही पडला आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारने अकरावीच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश प्रक्रियेची मुदत एक दिवसाने वाढवली. शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी या निर्णयाची घोषणा केली.
अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीसाठी 5 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत एक दिवसाने वाढवून 6 ऑगस्ट करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु असेल. पावसाचा जोर लक्षात घेऊन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने ट्विट करून ही मुदतवाढ जाहीर केली. तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावरही यासंदर्भातील सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी घाई करुन पावसात बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये 5 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत प्रवेश घेण्यास सांगण्यात आले. शुक्रवारपासून (2 ऑगस्ट) सुरु झालेल्या पावसाने एक दिवस वाया जाऊ नये म्हणून पालक घाई करण्याची शक्यता होती. सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरांत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांना प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयात पोहचणे अशक्य झाले.
या पार्श्ववभूमीवर प्रवेशासाठी जोखीम घेण्याची वेळ येऊ नये म्हणून शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षण विभागाला वेळापत्रकात बदल करण्याचे निर्देश दिले. आता ही मुदत एका दिवसाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वाढलेल्या मुदतीनुसार विद्यार्थी 6 ऑगस्टपर्यंत शुल्क आणि कागदपत्रे सादर करुन आपले प्रवेश निश्चित करु शकणार आहेत.