माफीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांच्या विरोधातील संताप कायम, गुन्हा दाखल होणार?
ठाण्यातसुद्धा सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला.
मुंबई : संतांवरच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माफी मागितली. तरीही त्यांच्या विरोधातली आंदोलनं थांबताना दिसत नाहीत. आता अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. रेड्याला शिक्षवतात. पण, माणसाला शिकू देत नाहीत, अशी यांची संस्कृती, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. हा त्यांचा जुना व्हिडीओ आता व्हायरल झाला. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी माफी मागितली. तरीही त्यांच्या विरोधातील रोष कमी होताना दिसत नाही.
पुण्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेनं पोलिसांतच तक्रार दिली आहे. संतांबद्दल सुषमा अंधारे यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी साहित्य परिषदेनं केली आहे. तसं निवेदन देहू रोड पोलीस ठाण्यात देण्यात आलंय.
संताच्या काळात काही लोकांनी त्यांना त्रास दिला. तीचं विकृती सांप्रत काळातही डोके वर काढू पाहत आहे. याला कुठंतरी पायबंद बसावा, यासाठी पोलिसांत तक्रार दिल्याचं वारकरी म्हणाले.
अंधारे ज्या पक्षात राहतील, त्या पक्षालाचं मतदान करणार नाही, अशी शपथ महानुभाव पंथीयांनी औरंगाबादमध्ये भगवान श्रीकृष्णासमोर घेतलीय. जळगाव आणि मुक्ताईनगर येथेही सुषमा अंधारे यांच्या विरोधात आंदोलन झालीत.
मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकातल्या आंदोलनात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते.
ठाण्यातसुद्धा सुषमा अंधारे यांच्याविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला. अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. हिंदुत्ववादाला विरोध करणाऱ्या ताई हिंदुत्ववादी पक्षाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महामानव असो की देवदेवता त्यांचा अवमान करणाऱ्यांसाठी कडक कायदा केला गेला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. हे माझं वैयक्तिक मत आहे. यावर चर्चा होत असेल, तर त्या चर्चेच स्वागत केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.