BJP : भाजपची विधानसभेसाठी मोर्चे बांधणी, लोकसभा निकालावरील मंथनानंतर पुण्यात मोठ्या घडामोडी, अमित शाह लावणार हजेरी
Amit Shah Vidhansabha Election : मुंबईत भाजपने लोकसभा पराभवावर मंथन केले. मित्रपक्षांच्या तक्रारींचा पाढा भाजप पदाधिकाऱ्यांनी वाचला. त्यातच विधानसभेसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अमित शाह हे त्यासाठी पुण्यात येत आहेत.
लोकसभा पराभवावर राज्यातील भाजप ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईत मंथन केले. त्यावेळी मित्रपक्षांविरोधात पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा सूर आळवला. तक्रारींचा पाऊस पाडला. त्यामुळे महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीत जागावाटप लवकर करावे आणि उमेदवार निश्चित करावा अशी मागणी करण्यात आली. आता विधानसभेसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात दाखल होत आहेत. त्यामुळे भाजपने विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.
रविवारी अमित शाह पुण्यात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच पुण्यात अधिवेशन होत आहे. ‘आता लक्ष्य महाराष्ट्र विधानसभा’ अशा अशयाचे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहे. अमित शहा राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना यावेळी मार्गदर्शन करतील. विधानसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने रणनीती बदलल्याची चर्चा आहे. भाजप अधिक जागांवर दावा करण्याची आणि मित्र पक्षांना योग्य उमेदवार निवडीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.
विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा भाजपने घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती उमेदवाराला नेमका कुठे फटका बसला, किती मते मिळाली. महाविकास आघाडीला कोणत्या बुथवर अधिक मतदान झाले. या भागात महायुतीतील संदोपसंदी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून आढावा घेण्यात आला. विधानसभेसाठी कोणता उमेदवार योग्य राहील. जातीय समीकरणं याची चाचपणी करण्यात आली. संभाव्य उमेदवारांची पण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपने विधानसभेसाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगाकडून सुक्ष्म नियोजन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.लोकसभा निवडणुकीतील त्रुटींचा अभ्यास करुन विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश देण्यात आले. नाशिकच्या विभागीय आयुक्तालयात निवडणूक तयारी आढावा बैठक झाली.