Ajit Pawar : मेटे गेले, विश्वासच बसत नाही; मराठा समाजाच्या बैठकीसाठी जात असताना झालेला अपघात दुर्दैवी, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
विनायक मेटेंच्या अपघाती निधनाविषयी त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अजूनही आपल्याला विनायक मेटे आपल्यातच आहेत, असेही अजित पवार म्हणाले.
पनवेल, रायगड : आजची पहाट सगळ्यांसाठी काळी पहाट झाली. मला अजूनही विश्वास बसत नाही, की माझे जवळचे सहकारी विनायक मेटे (Vinayak Mete) आपल्यातून निघून गेले, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर व्यक्त केली आहे. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात आले असता ते बोलत होते. मराठवाड्याचा सुपुत्र, सामाजिक जाण असलेले व्यक्तीमत्व, सतत मराठा (Maratha) समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाप्रकारची भूमिका मांडणारे हे व्यक्तीमत्व आपल्यातून गेले. ते कुठेही असले, तरी त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते. चार दिवसापूर्वीच सकाळी आठ वाजताची वेळ त्यांनी घेतली होती. मला देवगिरी बंगल्यावर भेटले आणि म्हणाले, दादा 15 सप्टेंबरला आपण कार्यक्रम ठेवला आहे. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि तुम्ही आले पाहिजे, असे ते म्हणाले होते, असे अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितले.
‘सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध’
आजही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी बैठकीसाठी बोलावले होते. रात्रभर प्रवास करत असताना ड्रायव्हरला कुठेतरी डुलकी लागली असावी आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी, अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. आयएएस, आयपीएस ऑफिसर असो किंवा आणखी कोणी, सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणत्याही बाबतीत काही अडचणी आल्या, तरी गरीब मराठा व्यक्तीला न्याय मिळवून देऊ, भले सरकार कुणाचेही असो पाठपुरावा ते करत असत, असे ते म्हणाले. समाजासाठी अहोरात्र झटणारा सहकारी आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.
अजित पवार यांच्याकडून दु:ख व्यक्त
‘सर्व प्रश्नांची जाण’
रात्रभर प्रवास करून येत असताना ड्रायव्हरला कुठेतरी डुलकी लागली असावी. खरे तर राजकीय किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो, रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे, असे आपण म्हणतो. पण वेळही तितकीच महत्त्वाची असते. ती टाळूनही चालत नाही, असे अजित पवार म्हणाले. मी दौरे करायचो, त्या अनेकवेळा ते माझ्यासोबत असायचे. कुठे कुठे कोणत्या समाजाची काय स्थिती आहे, या सगळ्या प्रश्नांची त्यांना जाण होती. सत्ता असो, नसो माझ्या मराठा समाजाचे प्रश्न सुटावे, हा त्यांचा अट्टाहास असे, असे ते म्हणाले.