Nawab Malik | नवाब मलिक यांचं समर्थन कुणाला? या बड्या नेत्याने सांगितलं
Nawab Malik Bail | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायलयाने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायलयाने नवाब मालिक यांना जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तब्येतीच्या कारणास्तव हा जामीन दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना 2 महिन्यांसाठी हा जामीन दिला आहे. मनी लाँड्रिग प्रकरणात मलिक कोठडीत होते. नवाब मलिक यांना जामीन मिळताच अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला. त्यामुळे नवाब मलिक यांचा शरद पवार गट की अजित पवार गट या दोन्हीपैकी कुणाला पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
“दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आम्हाला याबाबत निश्चितच समाधान आहे. नवाब मलिक यांनी गेल्या 25-30 वर्षात आपल्या कामाद्वारे ठसा उमटवला आहे, असेल आणि राहिल. आजच्या सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आम्ही स्वागत करतो”, असं सुनील तटकरे म्हणाले.
नवाब मलिक यांचं समर्थन कुणाला?
नवाब मलिक यांचं समर्थन कुणाला असेल, असा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर तटकरे म्हणाले की, “नवाब मलिक दीर्घकाळ राजकारण करणारे प्रगल्भ राजकीय नेते आहेत. याबाबतची भूमिका ते स्पष्ट करतील. नवाब मलिक यांना आधी त्यांची भूमिका स्पष्ट करु द्या, त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करु”.
नवाब मलिक यांच्यावरील आरोप
नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद संबधीत जमीन व्यवहार प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. जमीन व्यवहाराशी संबिधित प्रकरणात मलिकांवर टेरर फंडीग आणि मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. मलिक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप होता. कुर्ला परिसरातील गुन्हेगार शाह वली खानसोबत जमिन व्यवहार केल्याचा आरोप आहे. ही जमीन मुंबई उपनगरातील कुर्ला येथील एलबीएस रोडवरील ‘गोवावाला कंपाऊंड’ या नावाने आहे. गोवावाला कंपाउंड जमिनीच्या व्यवहारातून मलिकांना अटक करण्यात आली होती.