Ajit Pawar : मोठा पक्ष असल्यानं अनेक दिग्गज आपली मतं मांडतात, पण…; नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. मात्र आम्हाला विचारले जात नसेल तर आम्ही चर्चा करू, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते.
मुंबई : अधिवेशनासाठी (Assembly session) अत्यंत कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे लक्षवेधीचा वेळ तरी वाढवण्याची मागणी केली. ती मान्य करण्यात आली. सकाळी 10 ते 11 लक्षवेधीसाठी वेळ मिळणार आहे रोज तीन लक्ष्यवेधी ठेवायच्या. म्हणजे त्या वेळेचा जास्तीतजास्त फायदा उठवता येईल. अकरानंतर प्रश्नोत्तरे आणि बाकीचे शासकीय कामे अशी साधारण बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीच्या निमित्ताने आले असता ते बोलत होते. पावसाळी अधिवेशनाचा कालावधी,लक्षवेधीचा वेळ वाढवावा, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. लक्षवेधीचा वेळ वाढवण्याची मागणी मान्य झाली आहे. पूरस्थिती (Flood situation), शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गोगलगायींचे संकट असे विविध महत्त्वाचे मुद्दे अधिवेशनात असणार आहेत.
‘विधीमंडळात ठरते’
नाना पटोलेंच्या महाविकास आघाडीच्या वक्तव्यावरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही विधीमंडळाचे बोलत आहोत. विधीमंडळात काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आहेत. अशोक चव्हाण आहेत. कामकाज सल्लागार समितीतही हे दोघे आणि अमिन पटेल आहेत. मोठा पक्ष असल्यामुळे अनेक दिग्गज आपली मते मांडतात. शेवटी आम्ही विधीमंडळात ठरवतो त्याप्रमाणे कामकाज करतो, असे अजित पवार म्हणाले. थोडक्यात जे काही ठरते ते विधीमंडळात ठरते. बाहेरच्या बोलण्याला फारसे महत्त्व नसल्याचेच अजित पवार यांनी नाना पटोलेंना अप्रत्यक्ष सांगितले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
नाना पटोलेंचे वक्तव्य काय?
आमची आघाडी काही पर्मनंट आघाडी नाही. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही. विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. मात्र आम्हाला विचारले जात नसेल तर आम्ही चर्चा करू, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता. त्याप्रमाणे आम्ही विरोधात बसण्याची तयारी केली होती. 2019पासून राज्यात महाभारत सुरू आहे, त्याला सर्वस्वी भाजपा जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेता निवडीवरून नाना पटोले यांनी शिवसेना-राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केली. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.