मुंबई: औरंगाबादच्या नामांतरावरून वेगवेगळी मते येत आहेत. या मुद्द्यावर मी गेल्या आठवड्यातच बोललं होतो. राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने या विषयावर एकत्र बसून चर्चा करूनच मार्ग काढू असं सांगतानाच मुख्यमंत्र्याच्या शासकीय ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. त्याची आम्ही शहानिशा करून त्यामागचे कारण शोधू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. (ajit pawar reaction on cmo mention aurangabad name as sambhajinagar)
प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही भूमिका व्यक्त केली. राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. तीन पक्षांचे सरकार चालवताना काही वेळेला एखादा विषय निर्माण होत असतो. पण त्यावर चर्चा करून योग्य मार्ग काढता येतो. औरंगाबादच्या नामांतराबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करतील आणि योग्य तो मार्ग काढतील, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय कार्यालयाच्या (CMO) अधिकृत ट्विटर अकाउंटवर औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. नेमकं हे का झालं? जाणीवपूर्वक गडबड झाली की अनावधानाने ही गडबड झाली? ही बाब तपासून पाहू. कधी कधी अशा गोष्टी घडत असतात. नक्की काय झालं याची शहानिशा करूनच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं ते म्हणाले.
प्रत्येकाला मागणी करण्याचा अधिकार
वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्याला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पवारांना विचारले असता, कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढत असतात. कुणी विकासाबद्दल बोलत असतात तर कुणी नामकराणाचे मुद्दे काढत असतात. राज्यात गेल्या 60 वर्षात अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. कोण औरंगाबादबद्दल बोलतंय, कोण नगरबद्दल तर कोण पुण्याबद्दल बोलतंय. प्रत्येकाला आपली मागणी रेटण्याचा अधिकार आहे, असं सांगतानाच अनेक विमानतळांना महापुरुषांची नावे दिलेली आपण पाहिली आहेत. उत्तर प्रदेशात तर बसपा नेत्या मायावती यांनी शहर आणि जिल्ह्यांची नावंही बदलून टाकली. लोकशाहीत जे निवडून येतात ते लोक बहुमताच्या जोरावर असा निर्णय घेत असतात. अधिकाराचा वापर कसा करायचा याचा निर्णय ज्याचा त्याने चिंतन करून घ्यायचा असतो, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच विकासाला प्राधान्य दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही विकासावर भर दिला आहे. आम्हीही याच भूमिकेचं समर्थन करत असतो, असंही ते म्हणाले.
प्रिमियमचा निर्णय विचारपूर्वक
कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. त्यांना उभारी देण्यासाठीच प्रिमियमचा निर्णय घेतला आहे. विरोधक या निर्णयावर जाणीवपूर्वक टीका करत आहेत. दुसरं कोणतंही कारण नाही. मुद्रांक शुल्काबाबतच्या निर्णयावरही विरोधकांनी टीका केली होती. पण त्याचा सर्वांनाच फायदा झाला होता. त्यामुळेच प्रिमियमचा निर्णयही ग्राहकांचे हित लक्षात घेऊनच घेतला आहे, असं ते म्हणाले. एसआरचे अनेक प्रकल्प ठप्प आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या किंमती वाडत होत्या. त्यामुळे प्रिमियमचा निर्णय घेतला असून त्यामुळे ग्राहकांना फायदाच होणार आहे. राज्यातील चार प्रमुख महापालिकांच्या आयुक्तांनीही हा निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यामुळेच विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्राकडून मदत नाही
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्याची मदत अजूनही केंद्राकडून आलेली नाही. आम्ही दहा हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्यातील दोन हजार कोटी द्यायचे बाकी होते. ते दिले आहेत. ही रक्कम कर्ज काढून दिली आहे, असंही ते म्हणाले. केंद्राकडे जीएसटीची 26 हजार कोटींची थकबाकी बाकी असून आता दर आठवड्याला केंद्राकडून हे पैसे मिळू लागले आहेत, असंही ते म्हणाले.
तो भाजपचा प्रश्न
पूर्वी ग्रामपंचायतीत कोणताही पक्ष नसायचा. स्थानिक पातळीवर या निवडणुका लढवल्या जात होत्या. निवडून येणारा गट भेटून साहेब आम्ही तुमचेच कार्यकर्ते असे सांगायचे, असं सांगतानाच या निवडणुकीत भाजपचे 12 नेते लक्ष घालणार असल्याचं ऐकलं आहे. भाजपनं काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही, असंही ते म्हणाले.
तो ईडीचा अधिकार
ईडीने कृषी विभागाकडून कागदपत्रं मागवली आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एखाद्या चौकशी करणाऱ्या संस्थेने कुठल्या काळातील कोणत्या विभागाला कागदपत्रं मागवावीत हा त्यांचा अधिकार आहे. कागदपत्रं मागितली असेल तर ती देणं संबंधित विभागाचं काम आहे. याबाबत कृषी मंत्र्यांशी बोलणार होतो. पण त्यांना कोरोना झाला आहे. आज याबाबत सचिवांकडून माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ajit pawar reaction on cmo mention aurangabad name as sambhajinagar)
पालिका निवडणुकीत आघाडी व्हावी
मुंबई महापालिका निवडणुकीत मित्र पक्षांसोबत आघाडी करून पुढे जाण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. शेवटी अंतिम निर्णय शरद पवार घेतली. आघाडी व्हावी. मतांची विभागणी होऊ नये. नाही तर तुला ना मला, घाल तिसऱ्याला असं होऊ नये. आघाडी बाबत मी सकारात्मक आहे, असं त्यांनी सांगितलं. आघाडीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कोणताही अडथळा न येता स्थानिक स्वराज्य संस्थेत यश मिळावं हाच आमचा प्रयत्न आहे, असंही ते म्हणाले.
विधानपरिषदेत गडबड झाली असेल तर चौकशी करा
विधानपरिषद निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावरही अजितदादांनी भाष्य केलं. या निवडणुकीत गडबड झाली असेल तर त्याची खुशाल चौकशी करावी. आमचं काहीही म्हणणं नाही. पराभव झाल्यावर अशा गोष्टी पुढे आणल्या जातात. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर हा निकाल मॅनेज असल्याचं बोललं जात होतं. पण तसं होत नाही, असंही ते म्हणाले. (ajit pawar reaction on cmo mention aurangabad name as sambhajinagar)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/Gb2VXyRU1V
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2021
संबंधित बातम्या:
‘नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत’, बाळासाहेब थोरांतांनी CMO ला सुनावलं
औरंगाबाद विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज करा, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
(ajit pawar reaction on cmo mention aurangabad name as sambhajinagar)