मुंबई | 25 ऑक्टोबर 2023 : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे सरकारपुढील दबाव वाढला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्याची चर्चा आहे. शिंदे आणि फडणवीस दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत आहेत. अमित शाह यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अजित पवार शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काहीच माहिती नाही, असं खुद्द अजित पवारांनी सांगितलं आहे. शिंदे-फडणवीस मला विचारुन दिल्लीला गेले नाहीत, अशी अजब प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांनी अशी अजब प्रतिक्रिया दिल्यानंतर सारवासारव केली. “मी सकाळपासून मंत्रालयात आहे. या संदर्भात मला काही माहित नाही. मी माहिती घेऊन सांगतो”, असं अजित पवार म्हणाले.
विशेष म्हणजे शिंदे आणि फडणवीस काही दिवसांपूर्वीदेखील दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी देखील अजित पवार यांच्यासोबत गेले नव्हते. त्यावेळी पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय झाला होता. अजित पवार त्यावेळी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे अजित पवार त्या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीतही गैरहजर राहिले होते. अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांकडून त्यांच्या आजारपणाचं कारण सांगण्यात आलं होतं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे-फडणवीस दिल्लीला गेले होते.
दोन्ही नेत्यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला होता. अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्री देण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानंतर आजही अजित पवार शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आजसुद्धा अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आमदारांचं अपात्रतेचं प्रकरण तसेच मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला अजित पवार देखील असणं अपेक्षित होतं. कारण अजित पवार हे देखील सत्तेतील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या नेतृत्वातील एक मोठा पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. पण अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याची अजित पवार यांना माहिती नाही, असं ते स्वत: म्हणत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी तीनही पक्षांमध्ये समन्वय आहे की नाही? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय.