Ajit Pawar : दिलंं तर फार दिलं म्हणणार, नाही दिलं तर ओरड करत बसणार, निधीच्या आरोपांवर अजित पवारांचा पलटवार
हे आमदार आपल्या मतदारसंघात बारामतीसारखं काम करू असं म्हणतात आणि बारामतीला जादा निधी दिल्याचं सांगतात असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
बारामती : राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सर्वात मोठा बंड झालं आणि या बंडाचे मुख्य कारण सांगण्यात आलं शिवसेनेच्या आमदारांना मिळणारा अपुरा निधी (Insufficient funds) आणि हिंदुत्वाच्या विचारांशी घेतलेली फारकत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीला निधीच्या बाबत झुकतं माप दिलं. आणि इतर मतदार संघाला हवा तेवढ्या प्रमाणात निधी दिला नाही. असा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार वारंवार करत आहेत. त्याला आता अजित पवार यांनी त्याच भाषेत जोरदार प्रत्युत्तर दिलेला आहे, हे आमदार आपल्या मतदारसंघात बारामतीसारखं काम करू असं म्हणतात आणि बारामतीला जादा निधी दिल्याचं सांगतात असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. तसेच त्यांनी इतरही विविध मुद्द्यांवरून विरोधकांचा समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान मोदी यांचंही उदाहरण दिलं आहे.
काम केली तरी ओरड, नाही केली तरी ओरड
तसेच वाराणसीत नरेंद्र मोदी उभे राहिले. तिथे त्यांनी अनेक योजना दिल्या. जे महत्त्वाच्या पदावर असतात ते स्वतःला झुकता माप देणारच ना, असेही अजित पवार म्हणाले आहेत. काम केली, निधी दिला तर ओरड करणार आणि नाही काम केली, नाही निधी दिला तर तरीही ओरड करणार, हा मनुष्य स्वभाव आहे. आता दुसऱ्या कुणाला नावं ठेवता येत नाहीत, म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीवर यांच्या आरोप सुरू आहेत, अशी घनाघाती टीका अजित पवारांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केली आहे. तसेच विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करताना पातळी सोडू नये, अशा सूचनाही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
शिंदे यांनी राजीनामा का दिला होता?
तसेच ठाण्याच्या सभेत एकनाथ शिंदे यांनीच राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता. त्यांनी भाजपकडून मिळणाऱ्या वागणुकीवर आक्षेप घेतला होता. आता ते मुख्यमंत्री झालेत पूर्वीच्या सरकारने घेतलेले निर्णय थांबवल्याच्या बातम्या येत आहेत. कामांना स्थगिती दिली जात आहे. मात्र सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीही जन्माला येत नाही. सत्ता येते किंवा जाते हे भान सरकारने ठेवावं, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. तसेच आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी ही खंबीरपणे पार पाडू, विकासात अडचण येत असेल तर विरोध होणार. असेही अजित पवार म्हणाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात निधी वाटपावरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यावरून आता अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.